नंदुरबार : आगामी गणेशोत्सव आणि ईद उत्सव शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत राज्याचे क्रीडा, युवक कल्याण व अल्पसंख्यांक विकास मंत्री तसेच नंदुरबारचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सुरक्षा आणि पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 7 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच लोंबकळणाऱ्या व जीवितास धोका ठरणाऱ्या विद्युत तारा तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश वीज वितरण कंपनीला देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. विसर्जन मार्ग सुरक्षित, प्रकाशमय आणि अडथळामुक्त ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.
यावेळी अंडरग्राउंड वीज तारा टाकण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले. गणेशोत्सवापूर्वी किमान दोन महिने आधी शांतता समितीची बैठक घेण्याची परंपरा राबवावी, जेणेकरून नियोजन व अंमलबजावणीस पुरेसा वेळ मिळेल, अशी सूचना कोकाटे यांनी केली.
बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, सीईओ नमन गोयल यांसह शांतता समिती सदस्य, विभाग प्रमुख व गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकत्र येत असल्याने सर्व समाजबांधवांनी शांतता आणि बंधुभाव जपत उत्सव साजरा करावा. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, याची जबाबदारी मंडळांचे अध्यक्ष आणि पोलिस प्रशासनाने घ्यावी. गणेश मंडळांनी चांगले देखावे सादर करावेत. सामाजिक, अमली पदार्थ विरोधी व प्रबोधनपर देखव्यांना प्राधान्य द्यावे, तर राजकीय देखावे टाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, शहादा, नंदुरबार व गुजरातमधील गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी सारंगखेडा व प्रकाशा नदीपात्रात नेल्या जातात. त्यामुळे तेथील पुलांची तात्पुरती दुरुस्ती करण्याचे निर्देशही कोकाटे यांनी यावेळी दिले.