

नंदुरबार: बॅनर लावण्याच्या क्षुल्लक वादातून झालेल्या बेदम मारहाणीत एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. "मुख्य सूत्रधाराला अटक केल्याशिवाय अंत्यविधी करणार नाही," अशी आक्रमक भूमिका घेत मृत मोहित राजपूत याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी मृतदेह अडवून ठेवल्याने मोठी खळबळ उडाली. अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
शहरातील सिद्धिविनायक चौकात राहणाऱ्या मोहित राजपूत याचा काही तरुणांशी बॅनर लावण्यावरून वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान जीवघेण्या मारहाणीत झाले. गंभीर जखमी झालेल्या मोहितवर सुरत येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र मंगळवारी (दि. ११) त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांनी जयेश राजपूत यांच्या फिर्यादीवरून सुनील राठोड, मुकेश राजपूत, संजय राजपूत, यशवर्धन लुळे आणि अनिकेत तवर या पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आज (दि. १२) सायंकाळी मोहितचा मृतदेह घरी आणताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. संतप्त जमावाने मुख्य सूत्रधाराच्या अटकेची मागणी करत ठिय्या मांडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक संजय महाजन आणि निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कुटुंबीयांची समजूत काढून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले, त्यानंतर जमाव शांत झाला व अंत्यविधीसाठी तयार झाला.
दीड वर्षापूर्वीच मोहितच्या भावाचा अपघाती मृत्यू झाला होता. तेव्हापासून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती. त्याच्या अकाली जाण्याने आई-वडील, पत्नी आणि मुलांचा आधार हिरावला गेला असून, राजपूत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.