According to Dattanandaji Maharaj last wish, he was given a water burial in the Tapi River.
नंदुरबार : श्री दिगंबर आखाड्याचे परमपूज्य दत्तनंदजी महाराज यांना त्यांच्या अंतिम इच्छेनुसार तापी नदीत जलसमाधी देण्यात आली. धर्मपरंपरेनुसार मृत्यूनंतर दहनविधी केला जातो, मात्र जलसमाधीद्वारे अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना या भागात प्रथमच घडल्याने ती विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
श्री दत्तनंदजी महाराज यांचे सोमवारी (दि. २९ डिसेंबर) अल्पशा आजाराने समशेरपूर येथील श्री गुरुदत्त मंदिरात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७२ वर्षे होते. मंगळवारी (दि. ३० डिसेंबर २०२५) सायंकाळी उशिरा त्यांच्यावर जलसमाधीद्वारे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते.
जिल्ह्यातील तापी नदीकाठावरील प्रकाशा हे तीर्थक्षेत्र ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. येथे त्रिवेणी संगमावर दर बारा वर्षांनी अर्धकुंभमेळा भरवला जातो. त्यामुळे देशभरातील विविध आखाड्यांचे साधुसंत तसेच विविध राज्यांतील भाविक येथे नियमितपणे येत असतात. परिसरात २० हून अधिक लहान-मोठी प्रमुख मंदिरे असून अनेक साधुसंत येथे वास्तव्यास आहेत.
श्री दिगंबर आखाड्याचे परमपूज्य दत्तनंदजी महाराज हे त्यापैकीच एक होते. प्रकाशा जवळील नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर गावातील श्री गुरुदत्त मंदिरात ते अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. ते दीर्घकाळ धार्मिक कार्यात सक्रिय होते.
भक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूनंतर देहाला जलसमाधी दिली जावी, अशी त्यांची स्पष्ट अंतिम इच्छा होती. त्या संकल्पानुसार त्यांचा मृतदेह प्रकाशा (ता. शहादा) येथील त्रिवेणी संगमावर आणण्यात आला आणि धार्मिक विधी पार पाडून जलसमाधी देण्यात आली. या वेळी संत संतोष महाराज, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, प्रसाद कांतीलाल चौधरी यांच्यासह दिगंबर आखाड्याचे अनेक अनुयायी आणि भाविक उपस्थित होते.