नंदुरबार

काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारी अर्जांवर डॉ. गावित यांची हरकत; न्यायालयात दाद मागणार

दिनेश चोरगे

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाकडून दाखल असलेल्या तीनही उमेदवारी अर्जांवर भारतीय जनता पक्षाच्या तथा महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी हरकत नोंदवली आहे. त्यावर दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार अॅड. गोवाल पाडवी यांच्यासह काँग्रेसचे तीनही अर्जधारक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी १८ उमेदवारांनी २३ नामांकन अर्ज दाखल केले आहेत. नंदुरबार लोकसभा मतदार संघातून दाखल झालेल्या त्या उमेदवारी अर्जांची आज (दि.२६) छाननी झाली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीचे सर्व अधिकारी, अर्ज दाखल करणारे उमेदवार आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे उमेदवार गोवाल पाडवी, माजी मंत्री अॅड. के. सी. पाडवी आणि हेमलता पाडवी या तीनही जणांच्या उमेदवारी अर्जावर भाजपच्या उमेदवार खासदार डॉ. हिना गावित यांनी हरकत घेतली. तीनही अर्जदार एकाच परिवारातील असून प्रत्येकाच्या अर्जात या परिवारातील सदस्य नेमके कोणावर अवलंबून आहे? याविषयीचे खोटे उल्लेख आढळत असल्यामुळे हे अर्ज नामंजूर करावे, असे म्हणणे डॉ. गावित यांनी मांडले होते. त्यावर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला निर्णय मान्य नसल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून दाखल झालेल्या त्या उमेदवारी अर्जांच्या विरोधात न्यायालयातून दाद मागणार असल्याचे डॉ. गावीत यांनी माध्यमांसमोर सांगितले. यामुळे काँग्रेस पक्षाकडून दाखल झालेली उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT