नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : येथे ईद-ए-मिलाद च्या मिरवणुकी दरम्यान अचानक दोन गटांत वाद झाल्यानंतर त्याचे पर्यवसान तुफान दगडफेकीत झाले. दगडफेक करणाऱ्यांनी पोलिसांना आणि पोलीस वाहनांना लक्ष बनवल्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली. परिणामी अनावर झालेला जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. आज (दि. १९) दुपारी तीनच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला.
ईद-ए-मिलाद मिरवणुकीनिमित्त हजारो जणांचा जमाव नंदुरबार शहरातील रस्त्यावर उतरलेला होता. त्याचवेळी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे घडलेली दगडफेक आणि निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक एस श्रवण दत्त यांनी नंदुरबार शहरात बंदोबस्त तैनात केलेला होता. तरीही वाद घडला आणि अचानक जोरदार दगडफेक सुरू झाली. वाद नेमका काय झाला ते स्पष्ट झालेले नाही. तथापि दगडफेक करणाऱ्या जमावाने प्रथम पोलिसांना आणि पोलीस वाहनांना लक्ष बनवले. त्यामुळे पोलिसांच्या अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. काही पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
शहरातील प्रमुख बाजारपेठ देखील लक्ष बनवण्यात आल्यामुळे अवघ्या काही मिनिटात संपूर्ण शहर बंद पडले. दक्षता म्हणून शाळा बंद करून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. माळीवाडा, सोनार, खुंट, तेली गल्ली, काळी मशीद परिसर अशा प्रमुख ठिकाणी काही दुकानांचे व काही घरांचे नुकसान झाले. तसेच जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या चा वापर पोलिसांना करावा लागल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. अद्याप तणाव कायम असून पोलीस दल नियंत्रण मिळवून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. पाचनंतर परिस्थिती नियंत्रित आली.