नंदुरबार : बदलापूरच्या शाळेतील घडलेल्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळल्यानंतर आता तशीच घटना नंदुरबारमधील एका नामांकित शाळेमध्ये घडली आहे. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून सदर कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर शाळेनेही त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याला बडतर्फ केले. (A contract cleaner showed a pornographic video on his mobile to a minor student of Class V)
नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत विद्यार्थिनी शाळेत गेली असता तेथे कामावर असलेला कंत्राटी सफाई कामगार राजू ढंडोरे याने विद्यार्थिनीला आपल्या मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखविले. या घटनेची माहिती विद्यार्थिनीने घरी पालकांना सांगितल्यावर त्यांनी तत्काळ नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सफाई कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असल्याचीही माहिती सूत्रांकडून समजते.
बदलापूरसारखीच घटना घडल्यानंतर नंदुरबारमधील पालकांमध्ये आपल्या पाल्यांविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचं दिसून येतंय. पोलिसांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती नंदुरबारचे पोलिस अधीक्षक श्रवणदत्त यांनी दिली.