Crime News (File Photo)
नंदुरबार

Biodiesel Seized Nandurbar | तस्करांना मोठा दणका; बायोडिझेलसह 2 कोटी 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे-सुरत महामार्गावरील विसरवाडीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तीन टँकर चालकांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Illegal Biodiesel Tanker Raid

नंदुरबार : काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या बायोडिझेलने भरलेले तीन टँकर नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. या कारवाईत 1 कोटी 2 लाख 40 हजार रुपये किमतीचे बायोडिझेल, तीन टँकर आणि मोबाईल असा एकूण 2 कोटी 17 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई विसरवाडीजवळ धुळे-सुरत महामार्गावर करण्यात आली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील विसरवाडी हद्दीतून धुळे-सुरत महामार्गावर टँकरमधून बायोडिझेलची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने विसरवाडीजवळील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित तीन टँकर अडवून त्यांची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान तिन्ही टँकरमध्ये वाहनांमध्ये वापरण्यास योग्य नसलेले बायोडिझेल वाहून नेले जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी बाबुलाल नरसिंगराम बिष्णोई याचा जीजे-12 बीडब्ल्यू-7829, गुमानराम रुपाराम जाट याचा जीजे-12 बीडब्ल्यू-4947 आणि संतोष राधेश्याम सिंग याचा जीजे-12 सीटी-9537 क्रमांकाचा टँकर ताब्यात घेतला.

पहिल्या टँकरमध्ये 29 लाख 60 हजार रुपये किमतीचे 37 हजार लिटर बायोडिझेल, 30 लाख रुपये किमतीचे वाहन आणि 10 हजार रुपयांचा मोबाईल असा 59 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

दुसऱ्या टँकरमधून 38 लाख 40 हजार रुपये किमतीचे 48 हजार लिटर बायोडिझेल, 50 लाख रुपये किमतीचे वाहन आणि 10 हजार रुपयांचा मोबाईल असा 88 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तर तिसऱ्या टँकरमधून 34 लाख 40 हजार रुपये किमतीचे 43 हजार लिटर बायोडिझेल, 35 लाख रुपये किमतीचे वाहन आणि 10 हजार रुपयांचा मोबाईल असा 69 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

अशाप्रकारे तिन्ही टँकरमधील बायोडिझेल, वाहने आणि मोबाईल असा एकूण 2 कोटी 17 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर नामदेव चव्हाण यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून टँकर चालक बाबुलाल नरसिंगराम बिष्णोई (रा. भुनिया, जि. बाडमेर, राजस्थान), गुमानराम रुपाराम जाट (रा. दिनगड, जि. बाडमेर, राजस्थान) आणि राधेश्याम सिंग (रा. पुरा हरलाल, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4), 287, 288 तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT