नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य शासनाच्या विविध संवर्गांतील 200 पदांच्या भरतीकरिता राज्यसेवा 2020 परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वीच घोषित करण्यात आला असून, आता कुठल्या पदांना विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले, याबाबतचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, या निकालात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली असून, कक्ष अधिकारी, नायक तहसीलदार पदासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाला प्राधान्य दिले आहे.
दरम्यान, निकाला नाशिकच्या डॉ. स्नेहल लक्ष्मण शेलार (उपमुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी एनटीबी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावत नेत्रदीपक यश मिळवले आहे. त्याचबरोबर सागर मनोरे (कक्ष अधिकारी), वैभव आंबेकर (नायब तहसीलदार), पूनम आहिरे (कक्ष अधिकारी), महेश मौले (सहायक प्रकल्प अधिकारी) यांनी यश प्राप्त केले आहे. सहायक राज्य कर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योग उपसंचालक, सहायक संचालक, उपशिक्षणाधिकारी यांसह विविध पदांसाठी 21 मार्च 2021 ला राज्य सेवा पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती. दि. 4 ते 6 डिसेंबर 2021 ला मुख्य परीक्षा, तर दि. 18 ते 28 एप्रिलला मुलाखत प्रक्रिया पार पडली.