उत्तर महाराष्ट्र

खासदार संजय राऊत : आग, पाणी आणि शिवसेनेशी खेळण्याचा प्रयत्न कोणी करू नये

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमध्ये सुरू असलेले 'डॅमेज' कंट्रोल करण्यासाठी येथे दोन दिवसांपासून तळ ठोकून असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांच्या (ठाकरे गट) मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार केला. आग, पाणी आणि शिवसेनेशी खेळण्याचा कोणी प्रयत्न करू नये, भस्मसात व्हाल, असा निर्वाणीचा इशाराच त्यांनी दिला. खासदार राऊतांच्या या वक्तव्यामुळे 'बलवान' या चित्रपटातील डॅनी या अभिनेत्याच्या संवादाची आठवण याप्रसंगी शिवसैनिकांना आली असावी.

शालिमारजवळील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी (दि. ७) ठाकरे गटाचा मेळावा झाला. त्यावेळी खासदार राऊत बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनेचा वणवा महाराष्ट्रभर पेटला आहे. वणव्याला कधी खिंडार पडत नसते. गद्दारांवर आता सूड उगवण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणुकीत महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. इतिहास निष्ठावंतांचा लिहिला जातो, गद्दारांचा नव्हे, असे सांगत, यापुढे 'खोक्या'चे राजकारण चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनादेखील बेईमानांचा त्रास झाला होता. त्यांना आपल्या आयुष्यातील २२१ लढाया या स्वकीयांशीच लढाव्या लागल्या होत्या. शिवसेनाप्रमुखांनाही अनेकवेळा स्वकीयांशीच सामना करावा लागला. शिवसेनेला संकटे नवीन नाहीत. अनेक संकटांतून शिवसेना उभी राहिली आहे. काही गद्दारांमुळे शिवसेना संपणार नाही. उलट निष्ठावंत शिवसैनिक अधिक जोमाने पेटून उठतील. जे गेले त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे. मतदान खोक्यावर चालणार नाही. जनता विकली जाणार नाही, असे राऊतांनी ठणकावून सांगितले.

शिवसेना हे मंदिर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दैवत आहेत. या मंदिरात चोरी करणारे गद्दार सर्वांनी पाहिले आहेत. जनता गद्दारांना सोडणार नाही, असे सांगत शिंदे गटात गेलेले चप्पलचोर आहेत. देवाला हात घालण्याची हिंमत त्यांनी केल्यास त्यांना भिडण्याची आणि तुडवण्याची ताकद जनतेत आहे, असा इशाराही राऊतांनी दिला. याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचीही भाषणे झाली. उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, आ. नरेंद्र दराडे, माजी महापौर वसंत गिते, विनायक पांडे, गटनेते विलास शिंदे, सचिन मराठे, महेश बडवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

दिल्लीत मदारी बसलेत

शिवसेना अस्वलासारखी आहे, असे शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे. अस्वलाचे कितीही केस गळून पडले, तरी अस्वलाला फरक पडत नसतो. त्याप्रमाणे शिवसेनेला सोडून कितीही गेले, तरी शिवसेनेला फरक पडणार नाही. शिवसेनेला सोडून जे गेले तेथे अस्वल कोण अन् मदारी कोण, असा प्रश्न करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाचवणारे दोन मदारी दिल्लीत बसल्याची टीका खासदार राऊत यांनी केली.

शिंदे गटाचे आमदार घरी बसणार

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्र दौऱ्यात विधानसभा निवडणुकीसाठी 'मिशन १४५'ची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीतही मिशन ४५ चे टार्गेट आहे. असे असेल, तर मग शिंदे गटात गेलेले ४० आमदार आणि १२ खासदार कुठे जाणार, असा प्रश्न करत खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट सर्व घरी बसणार, असा दावा केला.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT