उत्तर महाराष्ट्र

Nashik : चाळीतले उद्योग : पत्राचाळीत ज्वलनशील पदार्थांचे सर्रास उत्पादन

गणेश सोनवणे

नाशिक : सतीश डोंगरे 

अंबड आणि सातपूर एमआयडीसीत उभारलेल्या पत्राचाळीत कोणताही उद्योग उभारण्याचा जणू काही चाळमालकांकडून परवानाच दिला जातो. त्यामुळे या चाळीत सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसताना अगरबत्ती, कापूर यासारख्या ज्वलनशील पदार्थांचे उत्पादन बिनदिक्कतपणे घेतले जाते. धक्कादायक बाब म्हणजे एमआयडीसीमधील प्लेटिंगचे उद्योग रासायनिक सांडपाणी प्रकल्पांअभावी (सीईटीपी) अडचणीत सापडले असताना, पत्राचाळीत प्लेटिंग उद्योग मात्र जोरात सुरू असल्याची धक्कादायक बाबही समोर येत आहे.

इगतपुरी येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अग्नितांडवानंतर प्रशासनाने औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट करण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र, अंबडमधील पत्राचाळीत ज्वलनशील पदार्थांचे सर्रास उत्पादन घेतले जात असून, त्याकडे प्रशासनाकडून काणाडोळा केला जात आहे. या चाळीत अगरबत्ती, कापूर यासह प्लेटिंग आणि पावडर कोटिंगचे उद्योग सुरू आहेत. विशेष म्हणजे कापूर तसेच अगरबत्तीचे उत्पादन घेतले जात असलेल्या शेडला लागूनच इतर शेडमध्ये ज्वलनशील प्रक्रियेशी निगडीत उत्पादने घेतली जातात. याठिकाणी शेकडो कामगार जीव धोक्यात घालून दिवसरात्र राबत आहेत. मात्र, त्यांच्या सुरक्षेबाबतच्या कोणत्याही पुरेशा उपाययोजना याठिकाणी बघावयास मिळत नाहीत. निमुळते रस्ते हीदेखील येथील मोठी समस्या असून, एखादी दुर्घटना घडल्यास कामगारांना बाहेर पडणे मुश्कील होईल, अशी स्थिती याठिकाणी दिसून येते.

दुसरीकडे प्लेटिंग अन् पावर कोटिंगचे उद्योगदेखील याठिकाणी दिवसरात्र सुरू आहेत. या उद्योगांमधून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाणी पत्राचाळीतून जाणाऱ्या नाल्यात सोडले जाते. पुढे या नाल्यातील पाणी गोदावरी नदीला मिळत असल्याचा अंदाजही वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व उद्योग विनापरवाना सुरू आहेत. खासगी मालमत्तेत असल्याचा फायदा घेऊन, हे सर्व प्रकार सुरू असले, तरी सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना नसणे, ही चिंताजनक बाब असल्याने याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

दै. 'पुढारी'ची भूमिका

सातपूर-अंबडसह शहरातील विविध भागांत पत्र्याचे शेड उभारून त्याठिकाणी उद्योग उभारले जात असून, त्यातून अनेकांना रोजगार मिळत आहेत. ही बाब योग्य असली, तरी विनासुरक्षा, विनापरवाना बेकायदेशीरपणे अशा प्रकारे उद्योग उभारणे कितपत योग्य? कायदेशीर, सर्व परवानग्यांची पूर्तता करून उद्योगांची उभारणी करावी व बेरोजगारांच्या हाताला रोजगार द्यावा ही दै. 'पुढारी'ची भूमिका आहे.

रहिवासी वसाहतीला लागून ॲसिडचा प्लांट

सातपूर परिसरातील एका खासगी भूखंडावर रहिवासी वसाहतीला लागूनच पत्र्याच्या शेडमध्ये चक्क ॲसिडचा प्लांट उभारण्यात आला आहे. या प्लांटमुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच लहानग्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. हा प्लांट त्वरित बंद करावा म्हणून परिसरातील रहिवाशांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्याचेही समजते.

पत्राचाळीत प्रयोगशाळा

पत्राचाळीत एक विनापरवाना प्रयोगशाळाही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी काही विदेशी मंडळींकडून नॅनो संशोधन केले जात असल्याचे समजते. रबर, सिलिकॉन तसेच टायर टेक्नॉलॉजीशी संबंधित कामे याठिकाणी केली जातात. १२००, १८००, २१०० डिग्री सेल्सिअसपर्यंतचे तापमान क्षमता असलेले ओव्हन याठिकाणी बसविण्यात आले आहेत. हे प्रकल्प अगरबत्ती-कापूरचे उत्पादन घेतले जात असलेल्या शेडलगतच आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT