नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
येथील जुनी स्टेशनवाडी परिसरात सोमवारी,दि.30 रात्री आठच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जुनी स्टेशनवाडी ते पगारे चाळ दरम्यान नाल्यांमध्ये नागरिकांना सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी वनविभागाला कळविले असता वनविभागाने पाहणी करून पिंजरा लावला. त्यानुसार सोमवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी आला असता अलगद जेरबंद झाला. बिबट्याच्या डरकाळ्यांनी नागरिकांनी पिंजऱ्याकडे धाव घेत त्याला बघण्यासाठी गर्दी केली. वनविभागाचे प्रवीण गोलाईत, वनरक्षक दर्शन देवरे, विशाल शेळके, विजय साळुंखे, वाहनचालक शरद अस्वले यांनी घटनास्थळी भेट देत पिंजरा ताब्यात घेत नाशिक येथील रोपवाटिकेमध्ये घेऊन गेले आहेत.