उत्तर महाराष्ट्र

Leopard attack : नाशिकच्या म्हसरुळमध्ये बिबट्याचा मुक्त संचार, वासरु केले फस्त

गणेश सोनवणे

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
म्हसरूळ शिवारातील आडगाव-वरवंडी रोडवरील मळे परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार असून, येथील गरुड वस्तीवर गुरुवारी (दि.22) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने वासरू फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे म्हसरूळ, वरवंडीच्या संपूर्ण मळे परिसरातील ग्रामस्थ दहशतीखाली आहे.

म्हसरूळ गावाच्या पूर्वेला मळे परिसराचा भाग मोठा आहे. यातील आळंदी कॅनॉल येथे बंडू बाळासाहेब गरुड यांची वस्ती आहे. शेतीच्या जोडीला ते दुग्धव्यवसायदेखील करतात. त्यांच्याकडे चार गायी व तीन वासरे आहेत. त्यातील एका वासरास मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास बिबट्याने लक्ष केले. ही बाब शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दूध काढण्यासाठी गरुड गेले असता त्यांच्या लक्षात आली. त्यांना एक वासरू कमी दिसले. त्याचा शोध घेतला असता, जवळीलच मोहन गरुड यांच्या उसाच्या मळ्यात मध्यभागी वासरू मृतावस्थेत आढळले. वासराला बिबट्याने फस्त केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत वनविभागास कळविण्यात आले आहे. या मळे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ वाढला असून, त्याचा बंदोबस्त करण्याची आणि परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

म्हसरूळ भागात बिबट्याने आतापर्यंत दोन वेळा पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. एक व्यक्ती आणि एका लहान मुलावरही हल्ला केल्याची घटना यापूर्वी घडली आहे. यापुढे बिबट्यांकडून प्राणघातक हल्ला होणार नाही, यासाठी वनविभागाने त्वरित दखल घ्यावी. नागरिकांनीही रात्री घराबाहेर पडताना सावधानता बाळगावी.
– प्रकाश उखाडे, ग्रामस्थ, म्हसरूळ

वारंवार घटना घडूनही दखल नाही
पंधरा दिवसांपूर्वी उखाडे यांच्या शेतात बाळासाहेब उखाडे यांच्यासमोर बिबट्या येऊन थांबला होता. त्याप्रसंगी सुदैवाने उखाडे हे बिबट्याच्या तावडीतून वाचले. तर गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी गरुड व उखाडे यांच्या शेतात बिबट्या फिरत असताना गरुड वस्तीतील लहानू गरुड यांच्या गोठ्यातील वासरू बिबट्याने फस्त केले होते. महिन्यापूर्वी देशमुख-कडाळे, जाधव यांच्या शेताजवळ बिबट्याने एका चिमुकल्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते.

SCROLL FOR NEXT