उत्तर महाराष्ट्र

कृषी महोत्सव नाशिक : उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत, पालकमंत्र्यांची माहिती

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सुमारे 46 हजार शेतकर्‍यांना पीकविमा कंपनीने 14 कोटी 50 लाख रुपये भरपाई दिलेली आहे. तर उर्वरित शेतकर्‍यांनाही लवकरच भरपाई देण्याच्या सूचना विमा कंपन्यांना दिल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतिगृहावर आयोजित कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी दिली.

मंगळवारी (दि.6) पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या ऑनलाइन सहभागी झाल्या. तर आमदार सीमा हिरे, उदय सांगळे उपस्थित होते. पालकमंत्री भुसे म्हणाले, शेतकरी अपार कष्ट करून शेतमाल पिकवतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे काही क्षणात होत्याचे नव्हते होऊन जाते. तेव्हा शेतकर्‍यांना पीकविमा योजनेचा आधार असतो. जिल्ह्यातील 81 हजार शेतकर्‍यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेतला. त्यापैकी 46 हजार शेतकर्‍यांना 14 कोटी 50 लाख रुपयांची मदत मिळाली आहे. 72 तासांच्या आत तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज केल्यास भरपाईसाठी पात्र ठरवले जाते.

'एनडीआरएफ'च्या माध्यमातून मिळणार्‍या मदतीच्या निकषात बदल केल्याचीही माहिती त्यांनी दिली. आमदार सीमा हिरे म्हणाल्या की, शेतकर्‍यांना धीर देण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द आहे. युवकांनी सेंद्रिय शेतीसारखे प्रयोग केल्यास त्यांना यातून चांगला रोजगार मिळू शकतो, असे त्या म्हणाल्या. पालकमंत्री भुसे व आमदार हिरे यांच्या हस्ते प्रगतिशील शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात आला. 'आत्मा'चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी प्रास्ताविक केले. कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT