Girish Mahajan 
जळगाव

Jalgaon Politics | विधान परिषदेमध्ये संकटमोचकच संकटात

भाजप विरुद्ध शिंदे सेना बंडखोर अशीच होणार मुख्य लढत

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्याच्या राजकीय इतिहासामध्ये प्रथमच संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे नेते गिरीश महाजन हे महायुतीमधील मित्रपक्षांच्या कार्यालयात स्वतः गेले. महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी त्यांनी मतदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीदेखील बंडखोरांचे बंड थांबवण्यात त्यांना अपयश आले आहे.

त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक प्रामुख्याने भाजप विरुद्ध शिंदे सेना (बंडखोर उमेदवार) अशीच रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, ३०० पेक्षा जास्त नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा करत अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनीही महायुतीसमोर मोठे आव्हान उभे करून नेत्यांचे टेन्शन वाढवले आहे.

अनपेक्षित उमेदवारी आणि महाजन यांचे मनधरणीचे प्रयत्न

जळगाव जिल्हा विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या निवडीपासूनच गिरीश महाजन यांच्यासमोर गुंतागुंतीची परिस्थिती (खिचडी) निर्माण झाली होती. अचानक नंदकिशोर महाजन यांचे नाव जाहीर झाल्यामुळे 'उमेदवार कोण असेल?' याविषयीची उत्सुकता संपली असली, तरी अनेकांनी अर्ज दाखल केल्यामुळे पेच निर्माण झाला. त्यामुळे गिरीश महाजन यांना महायुतीतील इतर पक्षांच्या कार्यालयांमध्ये जाऊन नगरसेवकांची मनधरणी करावी लागली आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करावे लागले. असे असूनही, महायुतीमधील शिवसेनेच्या महिला कार्यकर्तीने बंडखोरी करत थेट उमेदवारी कायम ठेवली. या निवडणुकीत १२ जणांना माघार घेण्यास प्रवृत्त करण्यात गिरीश महाजन यांना यश आले, मात्र शिवसेनेच्या महिला बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना माघार घेण्यास लावण्यात ते अपयशी ठरले.

बहुमताचा आकडा आणि गिरीश महाजनांची फिल्डिंग

निवडणुकीच्या रिंगणात जरी चार उमेदवार असले, तरी खरी लढत भाजप विरुद्ध शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवार यांच्यातच होणार आहे. गिरीश महाजन यांनी महायुतीच्या उमेदवाराला ५०० पेक्षा जास्त मते पडतील, असा दावा केला असला तरी शिंदे सेनेच्या बंडखोर महिला उमेदवाराने त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. भाजपचे स्वतःचे २४५ ते २४८ मते असली, तरी विजयासाठी आवश्यक असणारे ३१६ मतांचे बहुमत सध्या त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांना आघाडीतील घटक पक्ष, अपक्ष आणि शिंदे सेनेच्या मतांची अत्यंत आवश्यकता असणार आहे. हे सर्व राजकीय जुगाड जुळवण्यासाठी गिरीश महाजन स्वतः जळगाव जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. जिल्ह्याच्या इतिहासात ते यापूर्वी केवळ मतदानाच्या दिवशीच येत असत; मात्र पहिल्यांदाच अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेपासून ते मतदानाच्या काळापर्यंत त्यांना मतदारांच्या गाठीभेटी घेताना पाहिले जात आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची अनुपस्थिती

शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांना शिंदे सेनेच्या आमदारांसह अपक्ष, विविध आघाड्या आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर नेत्यांचेही छुपे समर्थन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कुठेही अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत, माघारीच्या वेळी किंवा कोणत्याही बैठकांमध्ये दिसून आले नाहीत, ज्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. जळगाव विधान परिषदेचे तिकीट शिंदे सेनेला सुटावे आणि ते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील यांना मिळावे, यासाठी पालकमंत्र्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. पालकमंत्र्यांची हीच नाराजी मतांच्या रूपात शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्या पथ्यावर पडू शकते आणि अप्रत्यक्षपणे शिंदे सेनेचे मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांचा छुपा पाठिंबा त्यांना मिळू शकतो, अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT