Jalgaon Shiv Sena BJP Dispute
जळगाव: विधान परिषद निवडणुकीत जळगावची जागा भाजपच्या पदरात पडल्याने शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाला असून, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नाराज असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. ही नाराजी केवळ गुलाबराव पाटलांपुरती मर्यादित नसून जिल्ह्यातील आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल करताना शिवसेनेच्या या बड्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मारलेली दांडी जिल्ह्यातील महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे थेट संकेत देत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेची ही जागा शिवसेनेला सुटावी आणि येथून आपले चिरंजीव प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी मंत्री गुलाबराव पाटील कमालीचे आग्रही होते. उमेदवारी जाहीर होण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत गुलाबराव पाटील मुंबईत ठाण मांडून बसले होते. मुख्यमंत्र्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांनी ३ ते ४ वेळा वर्षा बंगल्यावर फेऱ्या मारल्या. मात्र, अखेरच्या क्षणी ही जागा भाजपकडे गेल्याने पाटलांच्या गोटात कमालीची शांतता आणि प्रचंड नाराजी पसरली आहे.
आज पाळधी येथील गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपच्या या ‘एकतर्फी’ निर्णयावर आपल्या मनातील खदखद आणि संताप मंत्र्यांसमोर स्पष्टपणे बोलून दाखवला.
या राजकीय नाट्याचा थेट अंक उमेदवारी अर्ज दाखल करताना पाहायला मिळाला. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची एवढी मोठी ताकद असताना आणि स्वतः कॅबिनेट मंत्री जिल्ह्यात ठाण मांडून असताना, भाजप उमेदवाराचा अर्ज भरताना गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे आणि आमदार चंद्रकांत पाटील या चौघांनीही पाठ फिरवली. शिवसेनेचा एकही मोठा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता तिथे फिरकला नसल्याने ही अंतर्गत नाराजी आता चव्हाट्यावर आली आहे.
या सगळ्या हायव्होल्टेज ड्रामानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर आणि नाराजीवर मंत्री गुलाबराव पाटील यांची बाजू जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहमी आपल्या तडाखेबंद भाषणासाठी प्रसिद्ध असलेल्या गुलाबराव पाटलांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला असून त्यांनी मौन पाळले.
जळगावातील शिवसेना शिंदे गटाची ही नाराजी आता महायुतीच्या भाजप उमेदवाराला चांगलीच महाग पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यकर्त्यांमधील हा असंतोष आणि आमदारांची ही छुपी नाराजी मतदानातून बाहेर पडल्यास याचा थेट फायदा विरोधकांच्या पथ्यावर पडणार, अशी चर्चा आता जळगावच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.