

Jalgaon Vidhan Parishad Election
जळगाव : जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १६ उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी (दि. २) पूर्ण झाली. छाननीअंती सर्व १६ उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.
उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान ज्या अर्जांमध्ये किरकोळ त्रुटी आढळल्या, त्या उमेदवारांना लेखी सूचना देण्यात आल्या. मात्र अंतिम छाननीनंतर सर्व १६ अर्ज वैध घोषित करण्यात आले.
यामुळे भाजप, महाविकास आघाडी तसेच शिवसेना (शिंदे गट) समर्थित बंडखोर उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, ४ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने अंतिम निवडणूक चित्र त्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची मनधरणी सुरू असून कोण उमेदवारी कायम ठेवणार आणि कोण माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वैध ठरलेल्या १६ उमेदवारांपैकी दोन उमेदवार प्रमुख पक्षांचे अधिकृत उमेदवार असून उर्वरित १४ उमेदवार अपक्ष आहेत.
या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांत कार्यालयात सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेची निवडणूक निरीक्षक तथा आयएएस अधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवडणूक शाखेच्या मोरे मॅडम, प्रांताधिकारी गोसावी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.