जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील भाजपा कार्यालयात दुपारी चारनंतर मुलाखतींना सुरुवात झाली आहे.
या मुलाखतींसाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली होती. कार्यालय परिसरात वाहनांची मोठी गर्दी झाल्याने काही काळासाठी रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे कोर्ट परिसराकडे जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना वाहतूक जामचा त्रास सहन करावा लागला.
मुलाखतींना जिल्ह्याचे प्रभारी व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, भाजपाचे शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून भाजपात आलेले नितीन लढ्ढा यांच्यासह विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन पाटील आदींच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
75 जागांसाठी 500 इच्छुक उमेदवारांचे अर्ज
राज्यात लवकरच महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असताना जळगावमध्ये मात्र निवडणूक वातावरण आधीच तापलेले दिसून येत आहे. भाजपाकडे सुमारे 500 इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले असून, जळगाव महानगरपालिकेच्या एकूण 75 जागांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर इच्छुक असल्याने भविष्यात बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून भाजपात आलेले काही दिग्गज नेतेही या प्रक्रियेत सहभागी झालेले दिसून आले. त्यामुळे पक्षातील जुने निष्ठावंत कार्यकर्ते आणि नव्याने प्रवेश केलेले इच्छुक यांच्यात समन्वय साधण्याचे मोठे आव्हान भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वासमोर असणार आहे.