Thane Drug Case
जळगाव : ठाणे परिसरातील अमली पदार्थ प्रकरणाचे धागेदोरे भुसावळपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) पथकाने मंगळवारी ( दि. २२ ) पहाटे भुसावळातील खडका रोड परिसरात कारवाई करून एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ याला ताब्यात घेतले. ठाणे येथील तपासादरम्यान नशायुक्त ‘बटण’ गोळ्या जप्त झाल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
ठाणे NCB पथकाने एका प्रकरणाच्या तपासादरम्यान ‘सिद्धीक’ नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून नशायुक्त ‘बटण’ गोळ्यांच्या दहा स्ट्रिप जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. त्याच्या चौकशीत या गोळ्यांच्या पुरवठ्याचे धागेदोरे भुसावळातील एजाज खान ऊर्फ ‘सोन्या’ याच्यापर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर NCBच्या पथकाने भुसावळ गाठले.
मंगळवारी पहाटे NCBच्या पथकाने खडका रोडवरील मोहंमद अली रोड परिसरात कारवाई करत एजाज खान याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला स्थानिक बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सकाळी सुमारे नऊ वाजल्यापासून रात्री साडेआठपर्यंत त्याची चौकशी करण्यात आली.
या चौकशीत अमली पदार्थांचा पुरवठा कुठून होतो, त्याचे वितरण कोणामार्फत केले जाते. तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबत माहिती घेण्यात आल्याचे समजते.
दिवसभराच्या चौकशीनंतर NCBचे पथक एजाज खान याला घेऊन ठाणे-मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या प्रकरणात त्याची नेमकी भूमिका काय आहे आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबत NCBकडून अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.