शिक्षकांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करावे : वेवोतोलू केजो Pudhari Photo
जळगाव

शिक्षकांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करावे : वेवोतोलू केजो

वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रशिक्षण शिबिरात शिक्षकांना मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : आदिवासी समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचे काम अतिमहत्त्वाचे आहे. त्यासाठी शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य देशाच्या संविधानामध्ये सांगितले आहे, असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी वेवोतोलू केजो यांनी केले.

शहरात समाज कल्याण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शिक्षक दिनाच्यानिमित्त वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ५ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी विचार मंचावर अध्यक्षस्थानी वेवोतोलू केजो उपस्थित होत्या. प्रसंगी मंचावर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभागाचे कार्यवाह प्रा. दिगंबर कटयारे, जिल्हाध्यक्ष नेमीवंत धांडे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे उपस्थित होते.

सुरुवातीला प्रस्तावनेमधून प्रशिक्षण शिबिर घेण्यामागील उद्देश योगेश पाटील यांनी सांगितला. त्यानंतर पाण्याचा दिवा पेटवून मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अरुण पवार, नेमीवंत धांडे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्याला विकसित करत असताना अनेक आव्हाने शिक्षकांसमोर आहेत. त्यासाठी वैज्ञानिक व सामाजिक जाणीवा शिक्षकाने कायम जागृत ठेवाव्यात असे त्यांनी सांगितले.

यानंतर वैवोतोलू केजो यांनी सांगितले की, नवीन पिढी घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यासाठी त्यांनी कायम दक्ष राहिले पाहिजे. सूत्रसंचालन व आभार तालुका समन्वयक जितेंद्र धनगर यांनी केले. यावेळी प्रा. रवींद्र पाटील, जामनेर येथील रमेश गायकवाड, भीमराव दाभाडे, डॉ. मोहिनी मोरे, शोभा बोऱ्हाडे उपस्थित होते.शिबिरासाठी समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

दिवसभर शिबिरामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन

शिबिरामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागातील जिल्ह्यातील शिक्षकांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. प्रथम सत्रात प्रा. दिगंबर कट्यारे यांनी "वैज्ञानिक दृष्टिकोन" या विषयावर मार्गदर्शन केले. मानवाच्या उत्क्रांतीतून आपली प्रगती झाली. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारण भाव. जेवढा पुरावा तेवढा विश्वास. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवला पाहिजे असे त्यांनी सांगितले. द्वितीय सत्रात "जादूटोणाविरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा" याबाबत सविस्तर माहिती एड. भरत गुजर आणि जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी दिली.

तृतीय सत्रामध्ये 'सर्प विज्ञान' या विषयावर सविस्तर माहिती देऊन सापांविषयीच्या अंधश्रद्धा आणि समज याबाबत वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव बाळकृष्ण देवरे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे यांनी माहिती दिली. दुपारी जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे, शहर कार्याध्यक्ष आनंद ढिवरे, प्रा. दिलीप भारंबे यांनी विविध चमत्कार दाखवून त्या मागील सादरीकरण केले.

अखेरच्या सत्रात राज्याचे मानसिक आरोग्य प्रकल्पाचे पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी यांनी मन व मनाचे आजार कसे असतात त्याविषयी सविस्तर माहिती दिली. आपले मन आजारी पडते ते कसे आणि त्यावर प्राथमिक उपायोजना काय कराव्यात याबाबत त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT