Soldier joins border after wedding
जळगाव : लग्न झाल्यानंतर सर्वांना सुखी संसाराची आवड निर्माण होते. लग्नानंतर फिरायला जातात. मनोज पाटील यांचे ५ मे रोजी लग्न झाले आणि ८ तारखेला त्यांना सेवेसाठी तात्काळ हजर राहण्याचा कॉल आला. कुठलाही विचार न करता जवान मनोज पाटील अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह ८ मे रोजी सेवेसाठी रवाना झाले.
देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्यांना त्वरित बोलावणे आले आहे. त्यांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक ८ रोजी सीमेवर काशी एक्सप्रेसने रवाना झाले.
सीमेवर आपले कर्तव्य निभावत असताना लग्नाच्या बंधनात बंधण्यासाठी सुट्टी घेऊन घरी आलेला खेडगाव नंदीचे येथील जवान मनोज 5 मे रोजी नाचणखेड़े (ता. पाचोरा) येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी लग्नबंधनात अडकला. भारतीय सेनेने आतंकवाद्यांच्या ठिकाणावर हल्ले केल्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. पाचोरा येथे लग्न समारंभ आटोपत नाही तोच सुट्टी घेऊन घरी आलेल्या जवानाला त्वरित सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी हजर राहण्याचे आदेश आले.
लग्नाची मनोहर स्वप्ने,आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना, या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी लग्न झालेले नंदीचे खेडगाव येथील मनोज ज्ञानेश्वर पाटील हा सैनिक हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी गुरुवारी सीमेवर रवाना झाला.
कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोज यांना गर्व आहे. देशापेक्षा मोठे काहीही नाही, अशा भावना मनोज यांनी व्यक्त केल्या आहेत. मनोज यांची पत्नी यामिनी यांनी देखील या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया दिली.
देशातील सर्वच जवानांच्या सुट्ट्या शासनाने रद्द केल्यामुळे घरी परतलेल्या जवानांना पुन्हा देश सेवेसाठी हजर राहावे लागत आहे. यातच मनोज हा देखील लग्न आटोपुन हातावर सजलेली मेहंदी, अंगावर राहिलेली हळद अशाच परिस्थितीत ८ मे रोजी प्रथम देशाच्या कर्तव्यासाठी रवाना झाला. त्याच्या या निर्णयाचे परिसरातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.