केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जळगावमधील केळी उत्पादकांशी थेट संवाद साधला.  Pudhari
जळगाव

Shivraj Singh Chouhan | 'मी मंत्री नाही, तुमचा 'मामा' म्हणून शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी आलोय'

Shivraj Singh Chouhan Visit Jalgaon | केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जळगावमधील केळी उत्पादकांशी थेट संवाद साधला

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Banana Farmers

जळगाव : “मी केवळ दिल्लीत बसून निर्णय घेणारा मंत्री नाही, तर तुमचा ‘मामा’ म्हणून तुमच्या समस्या ऐकण्यासाठी आलो आहे. शेतकऱ्यांची सेवा हीच माझ्यासाठी ईश्वरसेवा आहे,” अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जळगावमधील केळी उत्पादकांशी थेट संवाद साधला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात आयोजित ‘शेतकरी संवाद’ कार्यक्रमात त्यांनी जळगावच्या केळीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी २०० कोटी रुपयांचा ‘बनाना क्लस्टर’ उभारण्याची घोषणा केली. या प्रकल्पात ग्रीन प्लांट मटेरियलचाही समावेश असणार आहे.

कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुरू झाला. सकाळी ११ वाजताचा कार्यक्रम दुपारी उशिरा सुरू झाल्याने चर्चेला उधाण आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री Raksha Khadse, खासदार Smita Wagh, आमदार अमोल जावळे आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन उशिराने दाखल झाले, तर काही आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली. कार्यक्रमाची सुरुवात कन्या पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उत्कृष्ट शेतकरी आणि महिला बचत गटांचा गौरव करण्यात आला.

संवाद सत्रात शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. केळी विमा योजनांमध्ये बोगस प्रकरणांमुळे अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच केळीच्या दरांवर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘लॉबी’विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली. ‘जीआय’ मानांकन असूनही त्याचा आर्थिक फायदा होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. ठिबक सिंचनाचे प्रलंबित अनुदान आणि बोगस बियाण्यांचाही मुद्दा उपस्थित झाला.

या सर्व प्रश्नांवर उत्तर देताना चौहान यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांशी थेट संवाद साधूनच प्रभावी धोरणे तयार होतात.” त्यांनी जळगावात २०० कोटी रुपयांचा अत्याधुनिक बनाना क्लस्टर उभारण्याचे आश्वासन दिले. केळीवरील बुरशीजन्य रोगांवर अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची टीम पाठवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच केळी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी कोल्ड स्टोरेज व रायपनिंग चेंबरसाठी अनुदान देण्यात येत असल्याची माहिती दिली.

आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी ‘गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा’ अशा मराठीतून करत उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान, केळीच्या दरांवर परिणाम करणाऱ्या ‘लॉबी’वर लक्ष ठेवून त्यावर नियंत्रण आणले जाईल, तसेच आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाईल, असेही त्यांनी सांगितले. “जळगावात येऊन शेतकऱ्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही,” असा शब्द देत त्यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT