Eknath Shinde Jalgaon prediction  Pudhari
जळगाव

Jalgaon Municipal Election Results | जळगाव महापालिकेच्या निकालाबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंचे 'ते' भाकीत ठरले खरे!

Jalgaon News | महायुतीला 60 प्लस जागा मिळतील, शिंदे यांचा दावा

पुढारी वृत्तसेवा

Eknath Shinde Jalgaon prediction

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या 75 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीने भक्कम बहुमत मिळवले आहे. विरोधकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच राहिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी केलेले “महायुतीला 60 प्लस जागा मिळतील” हे भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 46 जागा जिंकत ‘मोठा भाऊ’ची भूमिका बजावली, तर शिवसेना शिंदे गटाला 22 जागांवर समाधान मानावे लागले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 5 जागा मिळाल्या, तर अपक्ष उमेदवार 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 1 जागेवर विजयी ठरले आहेत.

महायुतीच्या प्रचारासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाईलद्वारे जळगावकरांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी केलेले 60 प्लस जागांचे भाकीत निकालात खरे ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

मतमोजणीस सकाळी दहा वाजेपासून सुरुवात झाली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात सर्वांना प्रवेश देण्यात आला होता. मात्र पत्रकारांना कॅमेरे व मोबाईल फोन आत नेण्यास मनाई करण्यात आली. आयुक्तांनी याबाबत स्पष्ट नकार देत केवळ कागद-पेन घेण्याचीच परवानगी दिली. मीडिया कक्षात कोणतीही अधिकृत घोषणा किंवा आकडेवारीची सुविधा नसल्याने विजयी उमेदवारांची माहिती जयघोषावरूनच अंदाजाने काढावी लागत होती.

प्रभाग क्रमांक 3 ‘ब’ मध्ये विजयाबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला. अपक्ष उमेदवार चैताली राहुल सोनवणे उर्फ ‘मोगली बाबा’ विजयी झाल्याचे समजून त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळला. मात्र नंतर भाजपच्या उमेदवार प्रतीक्षा कैलास सोनवणे यांचा विजय अधिकृतरित्या जाहीर झाल्याने त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला.

प्रभाग क्रमांक 10 ‘ड’ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी पुनर्मोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळल्याने वाद निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक, डीवायएसपी आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू रामदास भगाळे आणि अपक्ष उमेदवार पियुष नरेंद्र पाटील यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. अखेर अवघ्या 20 मतांनी भगाळे विजयी ठरले.

प्रभाग क्रमांक 1 ‘ड’ मध्ये अपक्ष उमेदवार भारती सागर सोनवणे यांनी शिवसेना शिंदे गटाचे खान फरदीन फिरोज खान तसेच काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला.

या निवडणुकीत जळगावचे आमदार सुरेश भोळे यांचे पुत्र विशाल भोळे विजयी झाले आहेत. तसेच पाचोरा येथील आमदार डॉ. चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र डॉ. गौरव सोनवणे आणि कन्या डॉ. अमृता सोनवणे हे दोघेही विजयी झाले आहेत.

दरम्यान, पिंप्राळा भागातील नागरिक मोठ्या संख्येने मतमोजणी केंद्रावर जमा होऊन “आमचे मत कुठे गेले?” असा सवाल उपस्थित करत घोषणाबाजी करू लागले. सुमारे 100 ते 200 नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केले. या भागात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात पराभूत झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगवली.

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांनी विजयाच्या जल्लोषासाठी दोन डंपर भरून गुलालाची उधळण केली. मोठ्या जल्लोषात विजय साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या दोन्ही डंपरांना कुठलाही वाहन क्रमांक नसल्याचे चर्चेचा विषय ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT