जळगाव : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडील भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून पंकज भोयर आता येथील पालकमंत्री बनले आहेत. त्यांच्याकडे बुलढाणाचे सह पालकमंत्री पद देण्यात आलेले आहे त्यामुळे राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
भुसावळचे आमदार तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री . संजय सावकारे यांच्याकडे भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रात्री उशीरा अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जागेवर पंकज भोयर यांची नियुक्ती केली आहे. भोयर हे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांच्याकडे भंडाऱ्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तर संजय सावकारे यांना बुलडाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
भंडारा हे ना. संजय सावकारे यांना जाण्यासाठी अडचणीचे ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. तर काही स्थानिक भाजप नेत्यांच्या नाराजीमुळे त्यांच्या जागेवर पंकज भोयर यांना नेमण्यात आल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकीकडे रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून वाद होत असतांना फडणवीस यांनी भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलल्याची चर्चा देखील होत आहे.