

जळगाव : नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला कलगीतुरा आता अधिक रंगतदार झाला आहे. भाजप नेते व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते छगन भुजबळ हे दोघेही या पदासाठी दावेदार आहेत. अलीकडील घडामोडींमुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू असतानाच, रविवार (दि.24) रोजी आज चाळीसगाव येथे महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यात दोघे मान्यवर एकाच मंचावर दिसून आले. यावेळी हे दोघे एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबूज करत मधुर हास्याचे धनी बनल्याचे चित्र दिसून आले.
महायुतीमध्ये नाशिक जिल्ह्यात भाजपाला मोठा फटका बसला आहे. येथे शिंदे गट व अजित पवार गटाच्या आमदारांनी वर्चस्व राखले आहे. मंत्रिमंडळ विस्तारावेळी दादा भुसे यांचे नाव पुढे असतानाही, गिरीश महाजन यांना कुंभमेळा मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्याचवेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाले आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर पुन्हा रस्सीखेच सुरू झाली.
भुजबळ यांनी ज्याचे जास्त मंत्री तोच पालकमंत्री असे विधान करून राजकीय पेच अधिकच वाढवला आहे. शुक्रवार (दि.15) रोजी गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये ध्वजारोहण केले यावेळी देखील पालकमंत्री पदाबाबत चर्चा रंगली. त्यांनी स्वतःच स्पष्ट केले की, मी पालकमंत्री नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जे ठरवतील तेच मान्य असेल.
रविवार (दि.24) रोजी आज चाळीसगाव येथील स्मारक उद्घाटनावेळी भुजबळ यांनी भाषणाची सुरुवात करताना महाजन यांना संकटमोचक असे संबोधले. त्यामुळे संकटमोचक कोणाचे संकट दूर करणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाशिकचे पालकमंत्री कोण होणार, या प्रश्नाचे उत्तर अजूनही गुलदस्त्यातच आहे.