Jalgaon Crime News : घोडसगाव शिवारात थरार! भुसावळच्या व्यापाऱ्याला मारहाण करून ५ लाख लुटले file photo
जळगाव

Jalgaon Crime News : घोडसगाव शिवारात थरार! भुसावळच्या व्यापाऱ्याला मारहाण करून ५ लाख लुटले

घोडसगाव शिवारात रात्रीच्या सुमारास थरार; बोदवडच्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Rs 5 lakh snatched from a trader from Bhusawal!

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मुक्ताईनगर ते घोडसगाव रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या भुसावळ येथील व्यापाऱ्याला इनोव्हा कारने कट मारून खाली पाडल्यानंतर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत ५ लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. २१ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घोडसगाव शिवारातील विश्रांती हॉटेलसमोर हा थरार घडला. याप्रकरणी बोदवड तालुक्यातील चार सराईत गुन्हेगारांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील वसंत टॉकीजमागील सुविधा निवासस्थान येथील रहिवासी व व्यापारी यश लक्ष्मीकांत जोशी (वय २३) यांचे वडील २१ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजेपूर्वी दुचाकीने मुक्ताईनगर-घोडसगाव मार्गावरून प्रवास करत होते. घोडसगाव शिवारातील विश्रांती हॉटेलसमोर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारने क्र. एमएच १२ पीक्यू ३९५६ त्यांच्या दुचाकीला जोरदार कट मारला. या धडकेमुळे ते रस्त्यावर कोसळले. ते सावरण्यापूर्वीच कारमधून उतरलेल्या चौघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली आणि त्यांच्याकडील ५ लाख रुपये रोख असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेत कारसह पोबारा केला.

याप्रकरणी यश जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासात या गुन्ह्यात प्रसाद शिवदास बोंडे (रा. आमडगाव, ता. बोदवड) आणि गौरव सुधीर राजपूत, विकी ईश्वर गुरचाळ, निलेश ईश्वर गुरचाळ (तिघे रा. नडगाव, ता. बोदवड) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्व संशयित आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

संशयित आरोपींवर खुनासह गंभीर गुन्ह्यांची मालिका

गुन्ह्यातील संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. बोदवड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध दंगल, गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, शस्त्र अधिनियम (आर्म्स ॲक्ट) आणि दरोड्याचे पाच गुन्हे दाखल आहेत. तसेच, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातही त्यांच्याविरुद्ध खुनाचा (कलम ३०२) गुन्हा नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT