Crime News 
जळगाव

Raver Crime : शरीरसुखास नकार देणाऱ्या 8 महिन्याच्या गरोदर पत्नीचा जीव घेतला, पतीच्या क्रूरकृत्याने जिल्ह्यात खळबळ

रावेर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांतच या प्रकरणाचा छडा लावला

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : रावेर तालुक्यातील निमड्या (सायबुपाडा) शिवारात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या आठ महिन्यांच्या गरोदर असलेल्या पत्नीने शरीरसुखास नकार दिला, याच रागातून पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केला. इतकेच नव्हे तर, हा खून नसून आत्महत्या आहे असा बनाव रचण्यासाठी त्याने पत्नीचा मृतदेह झाडाला टांगून पळ काढला. मात्र, पोलिसांच्या तपासात या नराधम पतीचा पर्दाफाश झाला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत लालू शरद पावरा (वय २५, रा. निमड्या) ही आरोपी शरद पावरा याची पत्नी होती. लालू ही आठ महिन्यांची गरोदर होती. ४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास निमड्या शिवारातील जंगलात आरोपी शरद याने पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, "मला आठवा महिना चालू असल्याने लालूने त्याला नकार दिला.

नकाराने संतप्त झालेल्या शरदने आपल्या गरोदर पत्नीला जमिनीवर पाडले. तिने प्रतिकार करू नये म्हणून तिचे हात-पाय आपल्या पायांनी दाबून धरले आणि तिच्या छातीवर बसून दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला. जोपर्यंत तिची हालचाल थांबत नाही, तोपर्यंत त्याने गळा दाबून धरला. लालूचा जीव गेल्याची खात्री पटल्यानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एक घृणास्पद डाव रचला.

आत्महत्येचा बनाव फसला...

पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने लालूच्या अंगातील फुल बाह्याचा शर्ट काढला, तो फाडून त्याची एक बाजू तिच्या गळ्यात बांधली आणि दुसरी बाजू जवळच असलेल्या 'काडसार'च्या (काटेरी झाड) बुंध्याला बांधून मृतदेह तिथेच टाकून तो घरी निघून आला. ही घटना आत्महत्या वाटावी असा त्याचा प्रयत्न होता. मात्र, रावेर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांतच या प्रकरणाचा छडा लावला.

या प्रकरणी अधारमळी येथील पोलीस पाटील रमजान अहमद तडवी (वय ३७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक १८१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३(१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासी अधिकारी पोउपनि मनोज महाजन करीत आहे. आरोपी शरद पावरा याला १३ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT