

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि थरारक प्रकरण उघडकीस आले आहे. प्रेमसंबंधांच्या आड येत असल्याच्या रागातून वडिलांना विष देऊन ठार मारल्याचा आरोप स्वतःच्या मुलीवर आणि तिच्या प्रियकरावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी प्रियकर-प्रेयसी दोघेही पोलीस कर्मचारी असल्याने या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खून, कट रचणे आणि पुरावा नष्ट करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तीन वर्षांनी समोर आला खूनाचा कट
भद्रावती येथील ३० वर्षीय पोलीस कर्मचारी आशिष महेश शेडमाके यांनी २३ मार्च रोजी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. या अर्जात त्यांनी महिला पोलीस कर्मचारी आर्या जयंत बाल्लावार हिने तिच्या वडिलांचा विष देऊन खून केल्याची धक्कादायक माहिती दिली. मृतक जयंत बाल्लावार हे स्वतः पोलीस विभागात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचा प्रकार २०२३ मध्ये घडला असला तरी त्यावेळी तो नैसर्गिक मृत्यू किंवा संशयास्पद मृत्यू मानून दाखल करण्यात आला होता. मात्र आता तीन वर्षांनंतर या प्रकरणातील खरा कट उघड झाला आहे.
प्रेमसंबंधांमुळे घरात वाद
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आशिष शेडमाके आणि आर्या बाल्लावार यांच्यात २०२२ पासून प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती आर्याच्या वडिलांना झाल्यानंतर घरात सतत वाद होत होते. वडील जयंत बाल्लावार हे मुलीला या संबंधांपासून दूर राहण्यास सांगत होते. यावरून ते आर्याशी वाद घालत आणि तिला मारहाण देखील करत असल्याची माहिती समोर आली आहे. या सततच्या वादातूनच आर्या आणि आशिष यांनी जयंत बाल्लावार यांना विष देऊन ठार मारण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे
विष मिळवण्यासाठी ओळखींचा वापर
कट रचल्यावर विष कुठून आणायचे असा प्रश्न आशिषसमोर उभा राहिला. त्याने आपल्या मावशीच्या अल्पवयीन मुलाला विष मिळू शकते का, अशी विचारणा केली. यानंतर त्या मुलाने भद्रावती येथील २२ वर्षीय चैतन्य उर्फ मोंटी सचिन गेडाम याच्याशी संपर्क साधला. त्याला संपूर्ण प्रेमप्रकरणाची माहिती देत आर्याच्या वडिलांना विष देण्याचा कट सांगितला. यानंतर २४ एप्रिल २०२३ रोजी चैतन्य गेडामने आशिष शेडमाके याला काचेच्या बाटलीत विष आणून दिले. त्यासाठी आशिषने चैतन्यला ५ हजार रुपये दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिल्कशेकमधून विष देऊन खून
पोलिसांच्या माहितीनुसार, २५ एप्रिल २०२३ रोजी आर्या बाल्लावार हिने आपल्या वडिलांना मिल्कशेकमध्ये विष मिसळून दिले. मिल्कशेक पिल्यानंतर जयंत बाल्लावार हे ड्युटीसाठी प्रशासकीय भवनात गेले. मात्र तेथे पोहोचल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली. उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
त्या वेळी मर्ग रिपोर्ट Marg Report, चौकशीत खोटे जबाब
घटनेनंतर पोलिसांनी त्या वेळी मर्ग दाखल केला होता. चौकशीदरम्यान आर्या बाल्लावार हिने पोलिसांना खोटे बयान दिल्याचे देखील तपासात समोर आले आहे. त्या वेळी तपासात विशेष गांभीर्य न दाखवल्याने हा गुन्हा उघडकीस आला नव्हता, असेही बोलले जात आहे.
तीन वर्षांनी तक्रार का?
तीन वर्षांनंतर अचानक हा प्रकार समोर येण्यामागील कारणाबाबत रामनगर पोलीस ठाण्याचे पोउपनि दराडे यांनी माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जयंत बाल्लावार यांच्या मृत्यूनंतर महिनाभरात आर्या आणि आशिष यांनी प्रेमविवाह केला. मात्र त्यानंतर दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. या वादाला कंटाळून आशिष शेडमाके यांनी तीन वर्षांपूर्वी घडलेली घटना पोलिसांसमोर उघड केली.
दोघेही पोलीस दलात नव्याने दाखल
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आशिष शेडमाके आणि आर्या बाल्लावार हे दोघेही २०२५ मध्ये चंद्रपूर पोलीस दलात दाखल झाले होते. सुमारे दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले होते. त्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा झाल्याने पोलीस विभागातही मोठी खळबळ उडाली आहे.
चार आरोपींवर खूनाचा गुन्हा
रामनगर पोलिसांनी या प्रकरणातआशिष महेश शेडमाके, आर्या जयंत बाल्लावार, चैतन्य उर्फ मोंटी सचिन गेडाम, एक विधिसंघर्ष मुलगा यांच्याविरुद्ध कलम १२० (ब), ३०२, २०१ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.