Scam Pudhari
जळगाव

Jalgaon News: पारोळ्यात महसूल विभागाचा घोटाळा; कोट्यवधींची सरकारी जमीन लाटली!

पारोळा तालुक्यातील मौजे हिरापूर येथे महसूल विभागाच्या आशिर्वादाने अब्जावधी रुपयांचा जमीन घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon News

जळगाव: जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मौजे हिरापूर येथे महसूल विभागाच्या आशिर्वादाने अब्जावधी रुपयांचा जमीन घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोणत्याही वैध दस्तऐवजाशिवाय मूळ मालकांची नावे ७/१२ वरून हटवून, संगनमताने जमीन हडप केल्याची तक्रार पुराव्यासह दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात तत्कालीन उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्या कार्यकाळातील निर्णयांवर संशयाची सुई असून, या 'फाईल' प्रकरणाने जळगाव महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हिरापूर येथील गट क्रमांक ३८ मधील ४ हेक्टर ७७ आर जमिनीवर १९७७ पासून सुशीलाबाई कुलकर्णी आणि यमुनाबाई कुलकर्णी यांची नावे भोगवटादार म्हणून होती. मात्र, १५ सप्टेंबर २०२० ते २२ सप्टेंबर २०२० या अवघ्या ७ दिवसांच्या 'सुसाट' प्रक्रियेत या जमिनीचा संपूर्ण कायापालट करण्यात आला. मंडळ अधिकाऱ्याचा अहवाल नसताना आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना हरताळ फासून ही जमीन काही ठराविक व्यक्तींच्या नावावर चढवण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केला आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी १५ सप्टेंबरला अहवाल मागवला, मात्र अहवाल त्यापूर्वीच ऑगस्टमध्ये (जावक क्रमांकाशिवाय) तयार होता. २२ सप्टेंबरला जबाब घेतले आणि त्याच दिवशी जमीन हस्तांतरणाचे आदेश पारित झाले. कोणतेही खरेदीखत किंवा बक्षीसपत्र नसताना मूळ मालकांची नावे महसूल नोंदीतून गायब करण्यात आली.

या तक्रारीत केवळ खाजगी जमीनच नव्हे, तर 'इनामी जमीन वर्ग २, ३, ४' आणि 'सरकारी पडीत जमीन' देखील नियमबाह्य पद्धतीने वाटप केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. शासनाचे अब्जावधींचे नुकसान करणाऱ्या या प्रकरणाची तक्रार आता थेट मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास जळगाव जिल्ह्यातील अनेक 'बड्या' धेंडांचे धाबे दणाणणार असून, महसूल विभागात मोठी पडझड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

"केवळ एका आठवड्यात सरकारी प्रक्रियेचा सोपस्कार पूर्ण करून खासगी व्यक्तींना जमिनीचे वाटप करणे, हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. विनय गोसावी यांच्या एरंडोलमधील संपूर्ण कार्यकाळातील (२०१९-२०२३) सर्व जमीन व्यवहारांची 'एसआयटी' मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे."
दीपककुमार गुप्ता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT