जळगाव : जैन हिल्सच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेतील ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) मुळे लिंबूवर्गीय फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना स्पष्ट दिशा मिळत आहे. जागतिक मानांकन असलेल्या बंदिस्त वातावरणात मातृवृक्षांपासून तयार केलेली रोगमुक्त रोपे वापरणे अत्यावश्यक असल्याचे मत या परिषदेत मांडण्यात आले.
लागवडीनंतर पहिल्या वर्षी रोपे सशक्त दिसतात; मात्र पुढील चार ते पाच वर्षांनंतर त्यावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. काही ठिकाणी झाडांना फुलोरा देखील येत नाही. परिणामी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक होते आणि अनेकदा पाच वर्षे सांभाळलेली फळबाग काढून टाकण्याची वेळ येते. ही स्थिती टाळण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे असल्याचे परिषदेच्या माध्यमातून संशोधकांनी अधोरेखित केले.
देशातील लिंबूवर्गीय फळ उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत परभणी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक धवन यांनी मार्गदर्शन केले. जैन स्वीट ऑरेंजच्या माध्यमातून जैन इरिगेशनसारख्या खासगी संस्थेने गेल्या दशकात प्रभावी संशोधन केले असून ते शेतकऱ्यांसाठी मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.
बडिहांडा व परिश्रम सभागृहात पार पडलेल्या तांत्रिक सत्रांमध्ये विविध संशोधन पेपर्स सादर करण्यात आले. डॉ. येलेश कुमार यांनी उत्पादन वाढीसाठी रोपांच्या गुणवत्तेवर भर दिला. डी. टी. मेश्राम यांनी पिकनिहाय पाणी व्यवस्थापन, सेन्सर सिस्टीम, ऑटोमेशनद्वारे वाढ, ताण, फुलोरा व फळगुणवत्तेवर भाष्य केले. जैन इरिगेशनचे एम. एस. लधानिया यांनी रूट एअर प्रुनिंग व क्लायमेट चेंज टेक्नॉलॉजी सादर केली. मल्लिकार्जून बिरादार यांनी जैवउत्तेजक व सूक्ष्मपोषक घटकांच्या वापरातून फळधारणा कशी वाढवता येते याची माहिती दिली.
जगदीश पाटील यांनी सेंद्रीय पद्धतीने जैन स्वीट ऑरेंज लागवड, तर आकाश शर्मा यांनी गोड संत्र्यासाठी अनावश्यक फांद्यांची छाटणी यावर मार्गदर्शन केले. मुळांच्या आकारात्मक पाणी व्यवस्थापनावर विश्वजित सिंग यांनी सादरीकरण केले. हायटेक ग्रीनहाऊस नर्सरी अंतर्गत मायक्रोबडेड सिट्रस रोपांवर डी. जी. पाटील यांनी वस्तुनिष्ठ माहिती दिली.
उत्पादन वाढीचे सोल्यूशन म्हणजे मातृवृक्ष – डॉ. अवी सडका
नर्सरी कायदे सध्या अधिक कठोर झाले असून जागतिक स्तरावर त्यांचे काटेकोर पालन होत आहे. चुकीच्या ग्राफ्टिंगमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बंदिस्त ग्रीनहाऊसमधील मातृवृक्षांपासून तयार झालेली, प्रयोगशाळेत तपासलेली रोपे व्हायरसपासून सुरक्षित असून उत्पादन वाढीस मदत करतात, असे मत इस्त्रायलचे शास्त्रज्ञ डॉ. अवी सडका यांनी व्यक्त केले. जैन हिल्सवरील हायटेक प्लांट फॅक्टरी शेतकऱ्यांसाठी ‘वन स्टॉप सोल्यूशन’ ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
‘सिट्रस पिकांवरील कीड व रोगांचे निदान, निरीक्षण आणि व्यवस्थापनासाठी नवोन्मेषी रणनीती’ या सत्रात हुआंगलॉन्गबिंग (HLB) रोग, फायटोफ्थोरा, फळ पोखरणारी पतंग, तसेच रोगमुक्त लागवड साहित्य निर्मिती प्रणालीवर देश-विदेशातील तज्ज्ञांनी सादरीकरण केले. ड्रोन इमेजिंग आणि AI च्या मदतीने HLB रोगाचे अचूक निदान कसे करता येते, यावर डॉ. विशाल काळबांडे यांनी माहिती दिली.
लिंबूवर्गीय फळांचे भव्य प्रदर्शन
परिषदेच्या उद्घाटनस्थळी भारतातील व महाराष्ट्रातील लिंबूवर्गीय फळांचे तसेच जैन इरिगेशनने विकसित केलेल्या ३४ वाणांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. लिंबू, संत्री, मोसंबी, किनो, ग्रेपफ्रूटसह ४४ प्रमुख वाणांचा यात समावेश होता. ‘जैन मॅडरिन-१’ आणि ‘जैन स्वीट ऑरेंज-६’ या वाणांची रोपे व कलमे विशेष आकर्षण ठरली.
संशोधन पोस्टर्सचे सादरीकरण
परिश्रम सभागृहाच्या तळमजल्यावर २० संशोधन पोस्टर्सचे प्रदर्शन भरवण्यात आले. मोसंबीच्या सालीपासून चटणी निर्मिती, ICAR-CCRI नागपूर येथे विविध जातींच्या चाचण्या, ‘साई शरबती’ या लिंबू जातीची कोळी किडीप्रती कमी संवेदनशीलता, तसेच फळप्रक्रियेतून उरलेल्या कचऱ्याचा अन्नउद्योगात वापर या विषयांवरील पोस्टर्स अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत होते.