ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन  Pudhari
जळगाव

Shiv Sena UBT Protest | कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाखाली बोगस वर्क ऑर्डरचे आरोप; मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी

ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

Nashik Kumbh Mela Agitation

जळगाव : नाशिक कुंभमेळ्याशी संबंधित कामांमध्ये कथित बोगस वर्क ऑर्डरच्या माध्यमातून प्रशासकीय आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या प्रकरणात जामनेर कनेक्शन समोर आल्याचा दावा करत आंदोलकांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

हातात साबण आणि सॅनिटायझर घेऊन ‘भ्रष्टाचार स्वच्छ करा’, तर भिंगाच्या माध्यमातून कुंभमेळ्याच्या कारभारात पारदर्शकता आणण्याची मागणी आंदोलकांनी केली. या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होण्यासाठी संबंधित मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी भूमिकाही आंदोलकांनी मांडली.

नाशिक कुंभमेळ्याशी संबंधित कामांसाठी बनावट वर्क ऑर्डर तयार करून प्रशासकीय व आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचे गंभीर आरोप यावेळी करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाकडे पत्रव्यवहार केल्याचे आंदोलकांनी सांगितले.

निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशीची मागणी

कथित बोगस वर्क ऑर्डर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी किंवा निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. चौकशीत दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.

या आंदोलनावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोदभाऊ घुगे, मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, शिवसेना महिला महानगरप्रमुख मनिषा पाटील, विनायक धर्माधिकारी, डॉ. रमाकांत कदम, प्रमोद सोनवणे, प्रभाकर कोळी, अशोक पाटील, प्रेमराज राठोड, किरण ठाकूर, महेश अहिरे, स्वप्निल राजपूत, किशोर धनगर, योगेश पाटील यांच्यासह मनसेचे सुनील सोनवणे, सागर जाधव, शैलेश चौधरी, तेजस कोळी, श्रीराम पाटील, चेतन पाटील, संकेत जाधव, गोपाल भारुडे, भरत पाटील, प्रशांत बाविस्कर, गणेश कुंभार, हेमंत कोळी, कुणाल पाटील, किरण सपकाळे, अनिल राठोड, बापू मेने, लखन पवार तसेच दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT