महाविकास आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली  Pudhari
जळगाव

Jalgaon MVA Protest | ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी

महाविकास आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी एक लाखांची मदत देण्याचीही मागणी

पुढारी वृत्तसेवा

MVA on Gyanesh Kumar Resignation

जळगाव : देशातील निवडणूक प्रक्रियेत सुरू असलेली ‘एसआयआर’ प्रक्रिया तातडीने रद्द करावी, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, या मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे मंगळवारी (६ ऑक्टोबर) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यासोबतच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्याची मागणीही करण्यात आली.

महाविकास आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली. दुपारी एक वाजता नियोजित असलेल्या मोर्चाला विलंब झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, बी. एस. पाटील, हाजी हारून मुक्ती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव आदींनी मनोगत व्यक्त केले.

‘एसआयआर’ प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

मतदार यादीच्या पुनरावलोकनासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘एसआयआर’ प्रक्रियेमुळे सामान्य मतदारांना अडचणी येत असल्याचा दावा महाविकास आघाडीने केला. जाचक अटी-शर्तींमुळे मतदारांचे हक्क बाधित होण्याची शक्यता असल्याचे सांगत ही प्रक्रिया तातडीने रद्द करून सुरळीत पद्धतीने मतदार यादीचे कामकाज करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा आग्रह

ईव्हीएममध्ये बिघाड होणे, बॅटरी डाऊन होणे तसेच मतदानाच्या अंतिम आकडेवारीत तफावत आढळल्याचे दावे निवेदनात करण्यात आले आहेत. ईव्हीएमच्या वापराबाबत जनतेच्या मनात शंका निर्माण झाल्याचा दावा करत आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे.

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत

जळगाव जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी अडचणीत असल्याचे महाविकास आघाडीने म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास महाविकास आघाडीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच महाविकास आघाडीतील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT