Jalgaon Murder Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | थकीत पगाराची मागणी; मुक्ताईनगरजवळ हॉटेल मालकाकडून मजुराचा काठीने ठेचून खून

'शेर-ए-पंजाब' हॉटेल मालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा; आरोपी फरार, पोलिसांकडून शोधमोहीम

पुढारी वृत्तसेवा

Muktainagar Laborer Murdered

जळगाव : थकीत पगाराची मागणी केल्याचा राग मनात धरून हॉटेल मालकाने मजुराच्या डोक्यात लाकडी काठीने वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर-बुरहानपूर महामार्गावरील उच्चंदा शिवारात घडली. या प्रकरणी हॉटेल मालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.

मृत मजुराचे नाव गोकुळ तारासिंग जाधव (वय ५५, मूळ रा. निंबापूर, ता. खकनार, जि. बुरहानपूर, ह.मु. पुर्णाड शिवार) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ जाधव हे पुर्णाड फाट्यावरील 'शेर-ए-पंजाब' हॉटेलमध्ये मजूर म्हणून काम करत होते. शनिवारी (दि. १ ) मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर-बुरहानपूर महामार्गालगत उच्चंदा शिवारातील एकनाथ पाटील यांच्या शेताजवळील सिटिझन गॅरेज परिसरात त्यांनी हॉटेल मालक कमलजितसिंग प्रितमसिंग याच्याकडे थकीत पगाराची मागणी केली.

याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या कमलजितसिंग याने लाकडी काठीने गोकुळ जाधव यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेनंतर मृताच्या पत्नी सुमित्राबाई गोकुळ जाधव (वय ५५) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी कमलजितसिंग प्रितमसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ब्लाइट पाटील करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT