जळगाव शहरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक लुटीच्या घटनेने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी फळव्यापाऱ्याला लक्ष्य करत त्याच्याकडील साडेबारा लाख रुपयांची रोकड लुटून काही क्षणांत पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
जळगाव: शहरातील गणपती नगर परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. दिवसभराची कमाई गोळा करून घरी परतणाऱ्या एका नामांकित फळव्यापाऱ्याची तब्बल साडेबारा लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग पाच अज्ञात दरोडेखोरांनी जबरीने लांबवले.सोमवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास ही थरारक लूटमार घडली असून, या घटनेमुळे जळगाव शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पससरले आहे.
नेमके काय घडले?
गणपती नगर मधील प्लॉट नंबर एक या ठिकाणी राहणारे फळव्यापारी ओमप्रकाश मधान हे नेहमीप्रमाणे बाजारातील आपले दुकान बंद करून रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास घराच्या दिशेने येत होते. त्यांच्याकडे दिवसभराच्या व्यवहारातील साडेबारा लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग होती. मधान हे गणेश नगराजवळ पोहोचताच, मागून दोन मोटारसायकलवरून आलेल्या पाच अज्ञात भामट्यांनी त्यांना अचानक गाठले. काही समजण्याच्या आत चोरट्यांनी त्यांच्या हातातील साडेबारा लाखांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून सुसाट वेगाने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच जळगाव शहरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
सीसीटीव्हीची तपासणी
पोलिसांनी परिसरातील सर्व प्रमुख मार्ग आणि दुकानांवरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासणी सुरू केली आहे.
पथके रवाना
संशयितांच्या वर्णनावरून आणि त्यांनी पळ काढलेल्या मार्गाचा माग काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके तत्काळ रवाना करण्यात आली आहेत.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.