Muktainagar Election Result 2025: जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक हॉट सीट मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यातील नगरपरिषद निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या गटांमध्ये थेट सामना रंगला असून, निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना चंद्रकांत पाटील या 1,917 मतांनी आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आघाडीमुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विजयाची आशा आहे.
दुसरीकडे, भाजपाच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या गटासाठी ही परिस्थिती धक्कादायक मानली जात आहे. मुक्ताईनगर हा खडसे कुटुंबाचा पारंपरिक गड मानला जात असल्याने, या ठिकाणी भाजपचा उमेदवार पछाडीवर आहे.
या निवडणुकीत स्थानिक विकास, सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष, तसेच वैयक्तिक राजकीय वर्चस्वाचे मुद्दे केंद्रस्थानी राहिले. त्यामुळे ही लढत केवळ नगरपरिषदेपुरती मर्यादित न राहता, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या राजकारणासाठीही दिशादर्शक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांमध्ये आघाडी कायम राहते की समीकरणे बदलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुक्ताईनगरचा अंतिम निकाल जळगाव जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा देणार, हे मात्र निश्चित.