

पेठ वडगाव : वडगाव नगरपरिषद निवडणुकीत यादव आघाडीने दणदणीत विजय मिळवत शहरात ‘ताईराज’ प्रस्थापित केले आहे. नगराध्यक्षपदासाठी यादव आघाडीकडून विद्याताई पोळ यांनी विजय मिळवून नगराध्यक्षपद खेचून आणले. नगरसेवकांच्या २० जागांपैकी यादव आघाडीने १५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले, तर जनसुराज्य–ताराराणी आघाडीला ५ जागांवर समाधान मानावे लागले.
निकाल जाहीर होताच शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. समर्थकांनी फटाके फोडून, गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करत विजय साजरा केला. चुरशीच्या प्रचारानंतर मतदारांनी यादव आघाडीला ठोस कौल दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत जनसुराज्य ताराराणी आघाडीच्या उमेदवार प्रविता सालपे यांचा पराभव झाला असून, विद्याताई पोळ यांना 2165 मतं मिळवत विजय खेचून आणला.
जनसुराज्य -ताराराणी आघाडीचे नगरसेवक पदासाठी कारभारी अजय थोरात, मोहनलाल माळी, संतोष चव्हाण, अंजली थोरात व राजश्री भोपळे यांनी आपल्या पाच जागा राखल्या. यादव पॅनल आघाडीला 15 जागी विजय मिळाला. विजयानंतर प्रतिक्रिया देताना विद्याताई पोळ यांनी वडगावच्या विकासाला गती देणे, नागरी सुविधा सुधारणा आणि सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. या निकालामुळे वडगावच्या राजकारणात यादव आघाडीचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे.