उमट्री (ता. वरला) येथे अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीविरोधात मोठे 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबविले Pudhari
जळगाव

Police Combing Operation | मध्य प्रदेशातील उमट्री येथे ४०० पोलिसांचे 'कॉम्बिंग ऑपरेशन'; दोन देशी कट्टे, ३२ वाहने जप्त, १२ संशयित ताब्यात

जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलिसांची संयुक्तपणे कारवाई

पुढारी वृत्तसेवा

MP Maharashtra Border Police Raid

जळगाव : जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील पार उमट्री (ता. वरला) येथे अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीविरोधात मोठे 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबविले. सुमारे ४०० पोलिसांच्या सहभागाने पार पडलेल्या या कारवाईत दोन देशी कट्टे, चार जिवंत काडतुसे, देशी कट्टे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, ३२ संशयित मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. तसेच १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून २७ फरार व संशयित आरोपींच्या घरांचे जिओ-टॅगिंग करण्यात आले.

या कारवाईची माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण परिसरात जप्त करण्यात आलेल्या बहुतांश गावठी कट्ट्यांचा उगम मध्य प्रदेशातील पार उमट्री येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार ही संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली.

फरार आरोपी आणि शस्त्रतस्करीविरोधात विशेष मोहीम

जळगाव जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणे, तसेच अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीच्या साखळीवर आळा घालणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. चोपडा शहर, चोपडा ग्रामीण आणि नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल शस्त्र अधिनियमातील गंभीर गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

पहाटे चार तासांचे सर्च ऑपरेशन

सुमारे ४०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि २० शासकीय वाहनांचा ताफा मध्यरात्री एक वाजता रवाना झाला. पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत पार उमट्री येथे व्यापक कॉम्बिंग सर्च राबविण्यात आला.

या कारवाईदरम्यान ४५ संशयित घरांची झडती घेण्यात आली, २० जणांची सखोल चौकशी करण्यात आली आणि १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. दोन देशी कट्टे, चार जिवंत काडतुसे, देशी कट्टे तयार करण्यासाठी लागणारे साचे व कच्चा माल जप्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्र नोंदणीच्या ३२ संशयित मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या. याशिवाय २७ फरार व संशयित आरोपींच्या घरांचे जिओ-टॅगिंग करण्यात आले.

जरी या कारवाईत अवैध शस्त्रनिर्मितीशी संबंधित साहित्य आणि काही शस्त्रे जप्त करण्यात आली असली, तरी अपेक्षेच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात तयार शस्त्रसाठा हाती लागला नसल्याचेही या कारवाईतून स्पष्ट झाले.

४०० हून अधिक पोलिसांचा सहभाग

या संयुक्त मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील ८ पोलीस निरीक्षक, ३५ दुय्यम पोलीस अधिकारी आणि २४० पोलीस अंमलदार, नाशिक ग्रामीणमधील पोलीस अधिकारी व ७० अंमलदार तसेच धुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व ७० अंमलदार अशा एकूण ४०० हून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या कारवाईसाठी २० शासकीय वाहनांचा ताफा वापरण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT