जळगाव

गिरीष महाजन गृहमंत्री व्हावेत, चंद्रकांत पाटलांची संत मुक्ताईकडे प्रार्थना

दिनेश चोरगे

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : संत मुक्ताईची पालखी मंगळवारी (दि.१८) पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाच्या भेटीला रवाना झाली. मुक्ताईच्या पालखी सोहळ्यावेळी विरोधक असलेले मदा खडसे व ना. गिरिश महाजन यांच्यामध्ये चर्चा झाली. यामुळे येत्या काळात पुन्हा खडसे व महाजन एकत्र येणार का? ही चर्चा रंगू लागली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट मुक्ताई चरणी नामदार गिरीश महाजन लवकर गृहमंत्री व्हावेत, अशी प्रार्थना केली.

टाळ मृदुंगाच्या गजरात आज संत मुक्ताईची पालखी पंढरपुरला रवाना झाली. यावेळी संत मुक्ताईची आरती नामदार गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या हस्ते झाली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, मंदाताई खडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार गिरीश महाजन यांनी टाळ-मृदुंगाच्या तालावर तल्लीन होत विठ्ठल नामाचा नामघोष केला. त्यानंतर त्यांनी मुक्ताईंच्या पालखीचे सारथ्य केले.

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांविरुद्ध आरोप करणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व भाजपाचे नामदार गिरीश महाजन आज मुक्ताई चरणी एकत्र विठुनामाच्या गजरात तल्लीन होताना दिसून आले. मुक्ताईची आरती झाल्यानंतर मंदाताई खडसे व आमदार गिरीश महाजन यांच्यात काही वेळ चर्चा केली. मात्र ती चर्चा काय झाली, हे समजू शकले नाही. तरीही नामदार गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यातील कटूता येत्या काळात कमी होऊन दोघेही नेते पुन्हा एकत्र येतील का? अशी चर्चा रंगू लागली आहे. तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन गृहमंत्री व्हावेत, अशी संत मुक्ताईंच्या चरणी प्रार्थना केल्याने शिंदे गटाने पुढचे गृहमंत्री गिरीश महाजन राहतील, असे संकेत दिले आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT