child marriage  file photo
जळगाव

Jalgaon child marriage case: अल्पवयीन मुलीचे मंदिरात गुपचूप लग्न; आजीची पोलिसांत धाव, आई-वडिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावणाऱ्या आई-वडिलांसह पाच जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon child marriage case

जळगाव: जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगर तालुक्यात कायद्याचे धिंडवडे काढणारी घटना समोर आली आहे. अवघ्या १६ वर्षे ११ महिने वय असलेल्या मुलीचे लग्न लावणाऱ्या आई-वडिलांसह पाच जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जन्मदात्यांनीच आपल्या पोटच्या मुलीचे भविष्य अंधारात ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र याला मुलीच्या आजीनेच चाप लावला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील वडगाव येथील महादेवाच्या मंदिरात ३ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात आले. मुलगी अज्ञान आहे हे माहित असतानाही तिचे वडील रामचंद्र बाबुराव जामुनकर आणि आई बबिता रामचंद्र जामुनकर यांनी सामाजिक भान विसरून हे लग्न लावून दिले. या बेकायदेशीर कृत्यात त्यांना गावातील आणि बाहेरील काही मध्यस्थांनी खतपाणी घातले.

आजीची फिर्याद अन् खळबळ

आपल्या नातीचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून उमापूर (जि. बुलढाणा) येथील आजी सुरपाबाई बाबुराव जामुनकर (वय ६५) यांनी धाडस दाखवत मुक्ताईनगर पोलिसांत धाव घेतली. आपल्या नातीचे वय कमी असतानाही तिला संसाराच्या खाईत लोटल्याची तक्रार त्यांनी दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी रामचंद्र बाबुराव जामुनकर (वडील), बबिता रामचंद्र जामुनकर (आई), झुंमकलाल हिरा धांडेकर, गजानन रमेश मांजरे (रा. धानोरा), तुकाराम उर्फ मयुर पाटील (वर, राय महालखेडा) यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १० आणि ११ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा तपास सपोनि जयेश पाटील हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT