Mhasavad Farmer Automobile Dealer Dispute  Pudhari
जळगाव

RTO Jalgaon | गाडी घेतली, पैसे मोजले: पण १० वर्षांनंतरही नंबर नाही मिळाला; आरटीओकडून चौकशीचे आदेश

सातपुडा ऑटोमोबाईल्सचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; म्हसावदच्या शेतकऱ्याची तक्रार, आरटीओकडून चौकशीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

Mhasavad Farmer Automobile Dealer Dispute

जळगाव : शोरूममधून नवी कोरी दुचाकी खरेदी केली. वाहनाची संपूर्ण रक्कमही अदा केली. एवढेच नव्हे, तर पसंतीचा चॉईस नंबर मिळावा म्हणून अतिरिक्त शुल्कही भरले. मात्र, वाहन खरेदी करून तब्बल दहा वर्षे उलटूनही पासिंग, आरसी बुक आणि नंबरच मिळाला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील शेतकरी प्रदीप सुभाष बोरोले यांच्या तक्रारीनंतर शहरातील सातपुडा ऑटोमोबाईल्सच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

म्हसावद येथील प्रदीप बोरोले यांनी २०१६ मध्ये जळगावातील सातपुडा ऑटोमोबाईल्समधून ‘स्प्लेंडर आय स्मार्ट’ ही मोटारसायकल खरेदी केली होती. वाहनाची संपूर्ण रक्कम त्यांनी रोख स्वरूपात अदा केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच पसंतीचा चॉईस नंबर मिळावा यासाठी सुमारे चार हजार रुपये अतिरिक्त शुल्कही शोरूमकडे भरल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

वाहन खरेदी केल्यानंतर आरसी बुक, पासिंगची कागदपत्रे आणि चॉईस नंबर मिळण्यासाठी बोरोले यांनी शोरूमशी सातत्याने संपर्क साधला. मात्र, दहा वर्षांचा कालावधी उलटूनही त्यांना आवश्यक कागदपत्रे मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या काळात शोरूमसह आरटीओ कार्यालयातही त्यांनी अनेकदा चकरा मारल्या. मात्र, समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आरटीआयमुळे प्रकार आला समोर

अखेर बोरोले यांनी माहिती अधिकाराचा (आरटीआय) आधार घेत आरटीओ कार्यालयाकडे संबंधित वाहनाबाबत माहिती मागवली. आरटीआयअंतर्गत मिळालेल्या माहितीत संबंधित चॉईस नंबरची नोंदणीच झालेली नसल्याचे समोर आल्याचा दावा बोरोले यांनी केला आहे.

त्यामुळे चॉईस नंबरच्या नावाखाली घेतलेले सुमारे चार हजार रुपये नेमके कुठे जमा झाले, वाहनाच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली होती का, पासिंग शुल्क भरले होते का, तसेच वाहनाची अधिकृत नोंदणी का झाली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या प्रकारामुळे शोरूमच्या कारभारासह वाहन नोंदणी प्रक्रियेतील संबंधित बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, तक्रारीची गंभीर दखल घेत आरटीओ विभागाने वाहन विक्रीपासून नोंदणी, पासिंग आणि शुल्क भरण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. वाहन विक्री, नोंदणी, पासिंग आणि भरलेल्या शुल्काची सविस्तर तपासणी केली जाईल. या संपूर्ण प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
— योगेश ताटू, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT