जळगाव

Vidhan Parishad election whip update |महायुतीच्या प्रत्येक पक्षाला व्हीप काढण्याचे निर्देश; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती

राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने खबरदारीचा पवित्रा घेतला आहे. महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाने आपल्या नगरसेवक व नगराध्यक्षांसाठी व्हीप जारी करावा, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सागितले.

महायुतीच्या मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. जळगाव विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात महायुतीतीलच एका घटक पक्षाच्या इच्छुक उमेदवाराने बंडखोरीची भूमिका घेतली होती. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर व समन्वयानंतर उमेदवारी मागे घेण्यात आली. त्यामुळे तात्पुरता वाद मिटला असला तरी मतदानाच्या टप्प्यावर कोणतीही बंडखोरी किंवा क्रॉस व्होटिंग होऊ नये, यासाठी महायुतीने अतिरिक्त दक्षता घेण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

रवींद्र चव्हाण म्हणाले की, "महायुतीतील प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांना व्हीप बजावण्यास सांगितले आहे. मतदानाच्या दिवशी सर्व मते महायुतीच्या अधिकृत उमेदवारालाच मिळावीत, यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे."

विधान परिषद निवडणुकीस अवघे काही दिवस शिल्लक असताना राज्यभर महायुतीच्या बैठका व मेळावे सुरू आहेत. "मी राज्यातील सर्व १७ विधान परिषद मतदारसंघांमध्ये फिरत असून महायुतीच्या विजयासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहे," असेही चव्हाण यांनी सांगितले.

महायुतीकडून व्हीप जारी करण्याचा निर्णय हा संघटनात्मक शिस्त राखण्यासाठी आणि मतदानावेळी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी घेतलेले प्रतिबंधात्मक पाऊल मानले जात आहे. जळगावसह राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT