अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. Pudhari
जळगाव

Jalgaon Drug Seized | जळगावमध्ये अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११ लाखांचे इफेड्रिन, गांजा जप्त

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांची मध्यरात्री कारवाई; मोपेडवरून तस्करी करणारा रामनगरातील ५५ वर्षीय संशयित ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Drug Racket Busted

जळगाव : जळगाव शहर आणि एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलिसांनी ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री संयुक्त कारवाई करत ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरले जाणारे इफेड्रिन रसायन आणि गांजाचा समावेश आहे. या कारवाईत मोपेडवरून अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.

एमआयडीसी परिसरातील नारियलवाला बाबा दर्ग्यासमोरील रस्त्यावरून काळ्या रंगाच्या बर्गमन मोपेडवरून इफेड्रिनची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या परवानगीने राजपत्रित अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री सुमारे ११.४० वाजता दर्ग्यासमोर पोलिसांचे पथक दबा धरून बसले होते. यावेळी नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय ५५, रा. रामनगर, मेहरुण, जळगाव) हा काळ्या रंगाच्या मोपेडवरून येताना पोलिसांना दिसला.

पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

मोपेडच्या डिक्कीत इफेड्रिन आणि गांजा

संशयिताच्या मोपेडची झडती घेतली असता डिक्कीत पांढऱ्या रंगाची स्फटिकयुक्त पावडर आणि गांजा आढळून आला. प्राथमिक तपासणीत ही पावडर इफेड्रिन असल्याचे निष्पन्न झाले. इफेड्रिनचा वापर एमडीसारखे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी तसेच काही ठिकाणी बॉडी बिल्डिंगमध्ये वजन व चरबी कमी करण्यासाठी केला जातो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जप्त केलेल्या मुद्देमालात—

  • इफेड्रिन : १ किलो ९६३ ग्रॅम — किंमत ९ लाख ८१ हजार ५०० रुपये

  • गांजा : २ किलो ११४ ग्रॅम — किंमत १ लाख ५ हजार ७०० रुपये

  • बर्गमन मोपेड (एमएच-१९-ईके-४३०५) — अंदाजे किंमत ३० हजार रुपये

असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी केलेल्या प्राथमिक तपासणीत जप्त केलेले पदार्थ इफेड्रिन आणि गांजा असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे यांच्या फिर्यादीवरून नूर मोहम्मद पटेल याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ०७०४/२०२६ अशी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने केली.

या कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक काळे, दीपक जगदाळे, संतोष पवार, अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, प्रवीण भालेराव, मुरली धनगर, महेश सोमवंशी, गोपाल पाटील, रवींद्र कापडणे, प्रदीप सपकाळे, राहुल रगडे आणि जयंत चौधरी सहभागी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT