Bribe Case  Pudhari
जळगाव

Jalgaon Bribe | बांधकाम कामगाराला मोफत सुरक्षा कीट देण्यासाठी १०० रुपयांची लाच घेताना तरुणी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वावडद्यात कारवाई; घटनास्थळावरून तब्बल २६ हजार ७७० रुपये जप्त

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Bribery Case Woman Arrested

जळगाव: शासनाकडून बांधकाम कामगारांना विनामूल्य मिळणारा अत्यावश्यक आणि सुरक्षा संच (कीट) देण्यासाठी गरीब लाभार्थ्यांकडून पैशांची लूट करणाऱ्या एका खाजगी महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. ४) रंगेहात पकडले.

भाग्यश्री विजय पाटील (वय २०, रा. सामनेर, ता. पाचोरा) असे लाचखोर तरुणीचे नाव आहे, ती जळगाव तालुक्यातील वावडदा येथील वाटप केंद्रावर खाजगी व्यक्ती म्हणून कार्यरत होती. एसीबीने तिच्याकडून लाचेचे १०० रुपये जप्त केले, शिवाय घटनास्थळावरून संशयास्पद अशी एकूण २६ हजार ७७० रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव येथील एका रहिवाशाने 'महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळा'च्या योजनेअंतर्गत अत्यावश्यक व सुरक्षा संच मिळण्यासाठी ३ जून रोजी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानुसार, ४ जून रोजी वावडदा येथील केंद्रावर संच नेण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले होते. तक्रारदार जेव्हा कीट घेण्यासाठी गेले, तेव्हा तेथे कार्यरत असलेल्या भाग्यश्री पाटील हिने, "तुमची केवायसी करावी लागेल, त्यासाठी आवश्यक असलेले दोन फॉर्म विकत घ्यावे लागतील," असे सांगून १०० रुपयांची लाच मागितली.

वास्तविक, शासनाच्या अर्जावरील मुद्दा क्रमांक ३ मध्ये 'हा संच पूर्णपणे विनामूल्य असून कोणी पैशांची मागणी केल्यास एसीबीकडे संपर्क साधावा' असे स्पष्ट नमूद होते. सतर्क तक्रारदाराने तातडीने जळगाव एसीबी कार्यालय गाठून तक्रार नोंदवली.

मिळालेल्या तक्रारीवरून एसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या पथकाने गुरुवारी वावडदा येथील केंद्रावर पडताळणी केली. केवायसीसाठी कोणत्याही फॉर्मची आवश्यकता नसताना, भाग्यश्रीने पंचांसमक्ष १०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारली. दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिला जागीच ताब्यात घेतले.

तेव्हा भाग्यश्रीच्या अंगझडतीत १३,६७० रुपये रोख मिळून आले. तर केंद्रावरील झेरॉक्स मशीनजवळ असलेल्या स्टीलच्या डब्याची झडती घेतली असता, त्यात आणखी १३,१०० रुपयांची रोकड आढळली. सर्व लाभार्थ्यांकडून केवायसीच्या नावाखाली ही वसुली सुरू असल्याचा संशय असून, एकूण २६,७७० रुपयांची रोख जप्त करण्यात आली आहे.

ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, महिला पोलीस नाईक रेश्मा अवतारे, सुरेश पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT