Jalgoan Hospital news
जळगाव : सैन्यातील जवानाच्या अडीच महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने दाखवलेल्या निष्ठुरतेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लसीकरणानंतर मृत्यू पावलेल्या चिमुरडीचा मृतदेह शवगृहात ठेवण्यास नकार दिल्याने, तिच्या आजोबांना अख्खी रात्र नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन शवविच्छेदन गृहाबाहेर काढावी लागली.
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील जिल्हा परिषद शाळेत अडीच महिन्यांची बालिका सचिता दीपक बोरसे हिला मंगळवारी लस देण्यात आली होती. लस टोचल्यानंतर काही वेळातच सचिताची प्रकृती खालावली, असा दावा तिच्या नातेवाईकांनी केला. कुटुंबीयांनी तिला तातडीने चाळीसगावच्या खासगी रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे बोरसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सचिताचे वडील दीपक बोरसे हे भारतीय सैन्यात असून सध्या अयोध्येत तैनात आहेत.
शवविच्छेदनासाठी सचिताचा मृतदेह जळगावच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. रात्रीची वेळ असल्याने शवविच्छेदन सकाळी होणार होते. अशा वेळी मृतदेह सुरक्षित शवगृहात ठेवण्याची विनंती तिचे आजोबा तुळशीराम मराठे यांनी प्रशासनाकडे केली. "रात्री पोस्टमार्टम करू नका, पण किमान मृतदेह शवागारात ठेवा," अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. मात्र, तांत्रिक कारणांचे दाखले देत जीएमसी प्रशासनाने मृतदेह ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला.
प्रशासनाच्या या नकारामुळे आजोबांना आपल्या मृत झालेल्या चिमुरड्या नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन रात्रभर शवविच्छेदन विभागाबाहेर बसून राहावे लागले. बुधवारी सकाळी जेव्हा हा प्रकार उघड झाला, तेव्हा रुग्णालयाचा हा 'पाषाणहृदयी' चेहरा समोर आला.
या गंभीर प्रकरणावर जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले की, "मृतदेह शवगृहात ठेवण्यासाठी पोलिसांचा पंचनामा किंवा मृत्यू दाखला आवश्यक असतो. मुलीच्या आजोबांकडे कोणताही पुरावा नसल्याने मृतदेह ठेवता आला नाही. बुधवारी सकाळी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर शवविच्छेदन करण्यात आले."
एका बाजूला लसीकरणानंतर झालेला मृत्यू संशयास्पद असताना, दुसऱ्या बाजूला शासकीय यंत्रणेने दाखवलेली ही अमानवीय वागणूक संतापजनक आहे. लसीकरण करणारी यंत्रणा आणि जीएमसी प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, सचीतासोबत ज्या इतर तीन बालकांना लस टोचण्यात आली, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.