Sangli Crime : निरपराध तरुणांना मारहाणीने समाजमन सुन्न

ईश्वरपूर पोलिसांविरोधात संताप; अधिकाऱ्यांकडून पाठराखण
Sangli Crime case
निरपराध तरुणांना मारहाणीने समाजमन सुन्नpudhari photo
Published on
Updated on

संदीप माने

ईश्वरपूर : बहे (ता. वाळवा) येथे निरपराध चुलत भावांना विनाकारण अमानुष मारहाण केल्याच्या घटनेने जिल्हा हादरला आहे. साध्या वेशातील पोलिसांच्या या कृत्याने ईश्वरपूर पोलिसांच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असलेले पोलिसच जेव्हा कायदा हातात घेतात, तेव्हा सामान्य माणसाने न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल केला जात आहे.

नेर्ले (ता. वाळवा) येथील अवधूत धनाजी पाटील (वय 20) आणि विराज सुरेश पाटील (वय 18) हे दोघे चुलत भाऊ शेतातील मोटर दुरुस्तीसाठी बहे पुलाच्या पश्चिमेला वायरमनची वाट पाहत थांबले होते. यावेळी साध्या वेशात आलेल्या चार पोलिसांनी त्यांना कोणतीही विचारणा न करता अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने दोघेही तरुण जीव वाचवण्यासाठी पळू लागले. पोलिसांनी अवधूतचा पाठलाग करून त्याला पकडले आणि बेदम मारहाण केली. पोलिसांनी त्याला फरपटत नेल्यामुळे त्याच्या दोन्ही पायांच्या तळव्यांची कातडी सोलून निघाली.

दुसरीकडे, विराजचे डोके मोटारीच्या गरम बोनेटवर ठेवून त्याला हातावर आणि कानावर मारहाण केली. ‌‘आम्हाला का मारताय?‌’ म्हणून दोन्ही भाऊ जिवाच्या आकांताने ओरडत होते, मात्र त्या पोलिसांना पाझर फुटला नाही. या अमानुष मारहाणीनंतर अवधूत काही अंतर चालून शेतात बेशुद्ध पडला, तर विराजला पोलिसांनी गाडीतून नेले. त्यांनी सांगितलेली ही आपबीती अंगावर शहारे आणणारी आहे.

वरिष्ठांची भूमिका आणि जनक्षोभ

जखमी तरुणांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते अद्याप वेदनेने तडफडत आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या या तरुणांची कोणतीही चूक नसताना त्यांना अशा प्रकारे वागणूक देणाऱ्या त्या चार पोलिसांवर अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही, असा प्रश्न समाजमनातून विचारला जात आहे. या कृत्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून, वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांच्या मौनाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news