Jalgaon temperature today
जळगाव : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जळगाव जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. अवघे नऊ दिवस उलटले असतानाच उन्हाच्या झळा तीव्र होत असून नागरिकांना वैशाखातील उष्णतेची चाहूल लागली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तापमानात सरासरी २ ते ३ अंशांची वाढ नोंदवली गेल्याने दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडू लागले आहेत. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून उकाड्यामुळे घामाघूम होण्याची वेळ आली आहे.
गेल्या वर्षी ८ आणि ९ मार्च रोजी कमाल तापमान अनुक्रमे ३६ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते. मात्र यंदा त्याच कालावधीत तापमान जवळपास ३८ ते ३९ अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे यंदा उन्हाचा तडाखा अधिक तीव्र असल्याचे स्पष्ट होत आहे.
६ मार्च: २०२५ मध्ये ३३°C, तर २०२६ मध्ये ३८.५°C — ५.५°C वाढ
७ मार्च: २०२५ मध्ये ३४.३°C, तर २०२६ मध्ये ३८.७°C — ४.४°C वाढ
८ मार्च: २०२५ मध्ये ३६.३°C, तर २०२६ मध्ये ३८.५°C — २.२°C वाढ
९ मार्च: २०२५ मध्ये ३७.५°C, तर २०२६ मध्ये ३८.६°C — १.१°C वाढ
५ मार्चपासून तापमानाने ३८ अंशांची पातळी ओलांडली असून ते कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच आर्द्रतेचे प्रमाण ७० टक्क्यांच्या आसपास राहिल्याने उकाडा अधिक जाणवत आहे. दिवसभर घामाच्या धारा वाहत असून अंगाची लाहीलाही होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
यंदा किमान तापमानात फारशी घट होत नसल्याने रात्री अपेक्षित गारवा मिळत नाही. त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळत नसल्याने जळगावकरांना ‘हॉट नाईट्स’चा अनुभव येत आहे.
मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने असा वेग घेतल्याने एप्रिल व मे महिन्यात उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तापमान ४५ अंशांच्या पुढे जाण्याची भीतीही तज्ज्ञांकडून वर्तवली जात असून प्रशासनाने उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.