minor girl assault case Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | जळगाव हादरले: तीन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचार; दोघांना अटक

मुक्ताईनगर, धरणगाव आणि चाळीसगावात अत्याचाराच्या घटना; ‘पोक्सो’सह विविध कलमांन्वये गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Minor Girls Assault Case

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुक्ताईनगर, धरणगाव आणि चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि बालविवाहाच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांत भारतीय न्याय संहिता (BNS), बाल अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायदा तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन प्रकरणांतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मुक्ताईनगर : बांधकामाच्या ठिकाणी चिमुरडीचा विनयभंग

मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा येथे २७ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना घडली. घरालगत सुरू असलेल्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी आरोपी अस्लम शहा रशीद शहा याने अल्पवयीन मुलीला नेऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याची फिर्याद दाखल झाली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयेश पाटील यांनी कारवाई करत आरोपीला २८ सप्टेंबर रोजी अटक केली.

धरणगाव : १४ वर्षीय मुलीवर धमकी देऊन अत्याचार

धरणगाव तालुक्यातील खपाट येथे १४ वर्षे सहा महिन्यांच्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच शामा नागो महाले याने गेल्या काही महिन्यांत धमकी देऊन अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडितेवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना तिने दिलेल्या पुरवणी जबाबावरून धरणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर यांनी आरोपीला अटक केली.

चाळीसगाव : बालविवाहानंतर अत्याचार; पीडिता गर्भवती

चाळीसगाव शहरातील गौताळा पार्क परिसराशी संबंधित तिसऱ्या प्रकरणात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. नातेवाईकांनी संबंधित कुटुंबीयांच्या मदतीने तिचा बालविवाह लावून दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. विवाहानंतर पतीने अत्याचार केल्याचा तसेच त्यानंतर नातेवाईकांच्या मुलानेही तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या अत्याचारामुळे पीडिता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी पती सिद्धांत मोरे, जॉन बाळू जगधने यांच्यासह एकूण आठ जणांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा, भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले तपास करीत आहेत.

अल्पवयीन मुलींशी संबंधित या तिन्ही घटनांमुळे जिल्ह्यात मुलींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असून, संबंधित प्रकरणांत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT