Sand Mafia Threatens to Tehsildar and run away  AI image
जळगाव

Jalgaon Sand Mafia|अवैध वाळूचा डंपर पकडणाऱ्या तहसीलदारांनाच धमकी; माफियांनी वाळू टाकून डंपर पळवला

Sand Mafia Threatens Tehsildar- अवैध वाळूचा डंपर पकडणाऱ्या तहसीलदारांनाच धमकी; माफियांनी वाळू टाकून डंपर पळवला

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या तापी-पूर्णा नदीच्या पात्रातून तांबडं सोनं लुटणाऱ्या वाळू माफियांना आता कायद्याची भीती उरलीये का? असा प्रश्न उपस्थित होतोय. बोदवड तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडणाऱ्या थेट तहसीलदारांनाच रस्त्यात अडवून, दमदाटी करत आणि पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हाडी शिवारातून पकडलेला डंपर बोदवड तहसील कार्यालयाकडे नेला जात असताना, स्कॉर्पिओतून आलेल्या गुंडांनी उड्डाणपुलाजवळ महसूल पथकाचा रस्ता अडवला. अधिकाऱ्यांना बळजबरीने खाली खेचून रस्त्यातच वाळू रिकामी केली आणि डंपर घेऊन पोबारा केला.

स्कॉर्पिओ आडवी लावली अन् जबरदस्तीने अधिकाऱ्यांना खाली उतरवलं

मिळालेल्या माहितीनुसार, बोदवडचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना कोल्हाडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. माहिती मिळताच तहसीलदार सपकाळे, नायब तहसीलदार अनिल नाडे व कर्मचारी सचिन पाटील यांच्या पथकाने कोल्हाडी-बोदवड मार्गावर सापळा रचून 'MH 28 BB 7935' क्रमांकाचा वाळूने भरलेला डंपर पकडला. डंपर चालकाकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याने तहसीलदार सपकाळे आणि महसूल सेवक ज्ञानेश्वर सुरडकर हे स्वतः डंपरमध्ये बसून तो तहसील कार्यालयाकडे घेऊन निघाले.

याच डंपरमधील वाळू रस्त्यावर टाकून देऊन माफिया पळाले.

मात्र, नाडगाव उड्डाणपुलाजवळ येताच 'MH 14 GA 8447' क्रमांकाची काळ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ भरधाव वेगाने आली आणि त्यांनी डंपरसमोर गाडी आडवी लावली. स्कॉर्पिओतील चार जण आणि दुचाकीवरून आलेले दोन अशा सहा-सात जणांनी थेट तहसीलदारांच्या अंगावर धावून जात दमदाटी केली. डंपरचा दरवाजा उघडून अधिकारी आणि कर्मचाऱ्याला जबरदस्तीने खाली ओढले. त्यानंतर रस्त्याच्या कडेला वाळू ओतून डंपर घेऊन सर्वजण पसार झाले.

तहसीलदारांनी मोबाईलमध्ये कैद केला ड्रामा, पोलिसांत गुन्हा दाखल

वाळू माफियांनी शासकीय कामात अडथळा आणत गुंडगिरी सुरू असतानाच तहसीलदार सपकाळे यांनी प्रसंगावधान राखत या सर्व प्रकारचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे. याप्रकरणी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक आकाश सिंग ठाकूर (रा. सालीपुरा, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) आणि त्याच्या सहा अज्ञात साथीदारांविरोधात बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुजोर वाळू माफियांवर कठोर कारवाई होणार का?

जळगाव जिल्ह्यातून देवधाबा, चिंचखेडा, शिरसाळा आणि कोल्हाडी मार्गे मलकापूरच्या बाजूला रात्रीच्या अंधारात अवैध वाळूची प्रचंड तस्करी सुरू असते. यापूर्वीही महसूल अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या चार घटनांची नोंद सरकारी दप्तरी आहे. महसूल विभागाचे अधिकारी स्वतः जीव धोक्यात घालून कारवाई करतात. पोलिसांनीही वाळू माफियांविरोधात कडक पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. आता बोदवड पोलीस या मुजोर वाळू माफियांवर कठोर कारवाई करणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT