पाळधी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिर परिसरात निर्माणाधीन स्लॅब अचानक कोसळला Pudhari
जळगाव

Jalgaon Sai Temple : बांधकाम सुरू असलेल्या साई मंदिराचा स्लॅब कोसळला, 2 गंभीर जखमी; पर्यटन विभागाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर!

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिर परिसरात कोट्यवधींची विकासकामे सुरू

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Sai temple slab collapse

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिर परिसरात सोमवारी (दि.१६) दुपारी धक्कादायक घटना घडली. पर्यटन विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोट्यवधींच्या विकासकामादरम्यान निर्माणाधीन स्लॅब अचानक कोसळला. या भीषण दुर्घटनेत ७ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. यातील दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी पर्यटन विभागाने कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. गेल्या वर्षभरापासून येथे नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवारी दुपारी कामगार २-५ फूट उंचीवर स्लॅब भरण्याचे काम करत असताना अचानक लोखंडी साचा (सेंटरिंग) निकामी ठरला आणि संपूर्ण स्लॅब खाली आला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्यातून ७ जखमी कामगारांना बाहेर काढून तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या शासकीय कामात कामगारांच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला आहे. कामगारांच्या डोक्यावर हेल्मेट नव्हते ना पायात सेफ्टी शूज. 25 फूट उंचीवर काम सुरू असताना जाळी किंवा इतर सुरक्षा साधने का नव्हती? बांधकामाच्या दर्जाची 'थर्ड पार्टी ऑडिट' खरोखर होते का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहे.

या घटनेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. हे काम पर्यटन विभाग (MTDC) स्वतः करत असून तिथे PWD चा संबंध नाही.

मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता, २५ फूट उंचीवर स्लॅब भरताना ज्या 'बेरिंग्स' किंवा आधार लावायला हवा होता, त्याची कोणीही तांत्रिक तपासणी केली नव्हती. या ठिकाणी एमटीडीसीचा एकही अभियंता उपस्थित नसल्याने कंत्राटदाराचे फावले. पंपिंग मशीनच्या अतिप्रचंड प्रेशरमुळे हा स्लॅब कोसळला. २५ फूट उंचीवर पंप वापरण्याऐवजी लिफ्टचा वापर करणे अनिवार्य असताना कंत्राटदाराने शॉर्टकट शोधला आणि कामगारांचा जीव धोक्यात घातला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT