Raver Law And Order
जळगाव : ईदच्या पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील रसलपूर आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. दरवर्षी या काळात गोवंश तस्करी तसेच तणाव निर्माण होण्याच्या घटना समोर येत असल्याने यंदा प्रशासनाने आधीपासूनच कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
याच अनुषंगाने स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ), संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि पोलिसांचा ताफा यांनी रसलपूर गावासह मध्य प्रदेश सीमेलगतच्या चेकनाक्यांना प्रत्यक्ष भेट देत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात ‘झिरो टॉलरेंस’ धोरण राबविण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.
रसलपूर आणि रावेर परिसर संवेदनशील मानला जात असल्याने शेजारील मध्य प्रदेशातून होणारी गोवंश वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी सीमावर्ती भागात विशेष नाकाबंदी सुरू केली आहे. मध्य प्रदेशातून जळगाव जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्यासाठी पाल-एमपी बॉर्डर येथे विशेष “ईद पोलीस चेक नाका” उभारण्यात आला आहे.
विशेषतः मध्य प्रदेशातील खरगोन आणि इंदूर भागातून येणारी वाहने या मार्गाने जळगाव जिल्ह्यात प्रवेश करतात. त्यामुळे या मार्गावरील तपासणी अधिक काटेकोर करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
सीमा ओलांडून येणाऱ्या प्रत्येक संशयास्पद वाहनाची सखोल तपासणी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. गोवंश तस्करीचा प्रयत्न आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांकडून दिवसरात्र गस्त, नाकाबंदी आणि संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच गावांमध्ये शांतता समित्यांशी संपर्क वाढवून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, ईदच्या काळात रसलपूर आणि परिसरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सीमावर्ती भागात चोवीस तास पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.