Rasalpur Girl Kidnapped Case
जळगाव : रावेर शहरातील व्ही. एस. नाईक कॉलेजच्या गेटवरून २२ वर्षीय तरुणीचे फिल्मी स्टाईलने अपहरण करून, तिला गुंगीचे औषध पाजत आळंदी येथे नेऊन बळजबरीने लग्न लावल्याची आणि त्यानंतर पुण्यात नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खळबळजनक प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात रसलपूर येथील एकाच कुटुंबातील सदस्यांसह मध्य प्रदेशातील एका व्यक्तीवर आणि अनोळखी मित्रांवर अत्याचार, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धक्कादायक घटनेची रावेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित २२ वर्षीय तरुणी ही ११ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास व्ही. एस. नाईक कॉलेज, रावेर येथे पायी जात होती. मुख्य गेटजवळ मुख्य आरोपी आदित्य राजू महाजन याने तरुणीला गाठले. 'तुझ्याशी काम आहे, जरा माझ्यासोबत चल' असे म्हणून तिला जबरदस्तीने आपल्या बाईकवर बसवले आणि बऱ्हाणपूर रोडने शहापूर फाट्यावरून हतणूर गावाजवळ घेऊन गेला.
हतणूरजवळ आधीच पांढऱ्या रंगाची कार घेऊन आरोपी राजू महाजन, हरदास महाजन, दिनकर महाजन, गणेश महाजन, रुपेश महाजन आणि निकिता महाजन (सर्व रा. रसलपूर) दबा धरून बसले होते. त्यांनी तरुणीला गाडीत बसवले आणि बिसलेरी पाण्याच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकून ते पाणी तिला पिण्यास दिले.
औषधामुळे तरुणीला चक्कर आल्यानंतर ती अर्धवट शुद्धीवर असताना आरोपी आदित्य महाजन, त्याचा मावस भाऊ (शिक्षक - रा. विरोदा, जि. बऱ्हाणपूर, म.प्र.) आणि एका अनोळखी ड्रायव्हरने तिला थेट आळंदी (पुणे) येथे नेले. तरुणी पूर्ण शुद्धीवर नसताना आदित्यने तिच्याशी बळजबरीने लग्न केले. या लग्नाला साक्षीदार म्हणून आदित्यच्या अनोळखी मित्रांनी सह्या केल्या.
लग्नाचा बनाव केल्यानंतर आरोपीने तिला पुण्यात एका रूमवर डांबून ठेवले. तिथे तिची मर्जी नसताना शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध केला असता, "तुझे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन आणि नातेवाईकांना पाठवेन," अशी थेट धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार केला.
पीडितेला पुण्यात डांबून ठेवलेले असताना, आरोपीचा मावस भाऊ हा त्यांना जेवणाचा डबा आणून देऊन या गुन्ह्यात पूर्ण मदत करत होता.
११ मे ते १७ मे या कालावधीत आरोपींच्या तावडीत अडकलेल्या पीडितेने कशीबशी सुटका करून घेत थेट रावेर पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. २६ मे रोजी दुपारी पोलिसांत अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात आरोपी १) आदित्य राजू महाजन, २) राजू महाजन, ३) हरदास महाजन, ४) दिनकर महाजन, ५) गणेश राजू महाजन, ६) रुपेश महाजन, ७) निकिता महाजन (सर्व रा. रसलपूर, ता. रावेर), ८) आदित्यचा मावस भाऊ (शिक्षक, रा. विरोदा, ता. जि. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश), ९) अनोळखी कार ड्रायव्हर, १०) आळंदीत लग्नाला मदत करणारे अनोळखी मित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलीस करत असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.